त्यावेळच्या 400 रुपयांची किंमत अजूनही विसरला नाही, हात जोडून मानले आभार; हार्दिक पंड्याचा व्हिडीओ व्हायरल

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक आपल्या निवडकर्त्यांचे 400 रुपयांची मदत केल्यामुळे आभार मानताना दिसत आहे. त्याचा हा संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून चाहत्यांनी सुद्धा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे.

कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर हार्दिकने यशाचे सर्वोच्च शिखर गाठले आहे. मात्र त्याचे पाय आजही जमीनीवर असल्याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बालपणी आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्याला त्याच्या निवडकर्त्यांनी त्यावेळी 400 रुपयांची आर्थिक मदत केली होती. हार्दिकने याची जाणीव ठेवत व्हिडीओ कॉलच्या माध्यामातून हात जोडून त्यांचे आभार मानले आहेत. हार्दिकने व्हिडीओ कॉलच्या माध्यामातून गुजरातीमध्ये संवाध साधला आहे. 31 वर्षीय निवडकर्त्यांनी हार्दिकचे तोंड भरून कौतुक करत तुझ्यावर देवाची कृपा असल्याचे म्हटले आहे. हार्दिकने यावेळी हात जोडून त्यांचे आभार मानले, तसेच तुम्ही दिलेले 400 रुपये खूप उपयोगी पडले, असे हार्दिकने म्हटल आहे.

हार्दिक पंड्या सध्या सय्यद मुश्ताक अली करंडकामध्ये धमाकेदार फलंदाजी करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-20 क्रिकेटमध्ये क्रमांक एकचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचा नावलोकिक आहे. तसेच मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबादारी सुद्धा त्याच्या खांद्यावर आहे. 2015 साली हार्दिकने मुंबई इंडियन्सच्या माध्यामातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. तसेच 2016 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिकची टीम इंडियाच्या संघात निवड झाली. त्यानंतर त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही. त्याच्या खेळाचा आलेख सतत उंचावत गेला आहे. हार्दिकने आतापर्यंत टीम इंडियाकडून 109 टी-20, 86 वनडे आणि 11 कसोटी सामने खेळले आहेत.