कर्णधार रोहित शर्माच्या कसोटी कारकीर्दीच्या समय समाप्तीची घोषणा जवळजवळ झाली आहे. तसेच आता त्याला आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही कर्णधार म्हणून मुक्त करण्याच्या दृष्टीने बीसीसीआयने पावले उचलली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे.
रोहितच्या भविष्याबाबत साशंकता निर्माण झाल्यामुळे गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली नव्या कर्णधाराचा शोध आधीपासूनच सुरू झाला होता आणि आगामी चॅम्पियन्स करंडकापासूनच त्याची चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे. रोहितला नेतृत्वाच्या ओझ्यातून मुक्त करत अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचा पर्याय म्हणून प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे. सध्या टी-20 मध्ये सूर्यकुमार यादवकडे हिंदुस्थानचे नेतृत्व आहे. मात्र त्याला वन डे क्रिकेटमध्ये सूर सापडत नसल्यामुळे तो संघाबाहेरच फेकला जातोय. अशा स्थितीत बीसीसीआयला अष्टपैलू हार्दिक पंड्याचाच पर्याय सर्वाधिक प्रभावी वाटू लागलाय. तसेच शुबमन गिल आणि ऋषभ पंतकडेही नेतृत्वाची क्षमता असल्याचे बोलले जात आहे.