‘मानसिक छळ झाला, अपमानित केलं; पण तो…’, कैफनं सांगितली हार्दिकच्या ‘कमबॅक’ची कहाणी, बायोपिक बनवण्याची मागणी

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याच्यासाठी गेले काही वर्ष चढ-उताराचे राहिले. खासगी आणि व्यवसायिक आयुष्यातही त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यात तालून-सुलाखून निघाल्यानंतर आता हार्दिक पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झालेला आहे.

एकेकाळी हार्दिक पंड्याला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद त्याच्याकडे आले तेव्हा चाहत्यांनी त्याला ट्रोल केले होते, मैदानातही त्याची हुर्या उडवण्यात आली होती. मात्र आता त्याच्याकडे दोन आयसीसी ट्रॉफी आहेत आणि हाच अनुभव घेऊन तो यंदा मैदानात उतरेल. मुंबई इंडियन्सचा चॅम्पियन करण्याचा दबावही त्याच्यावर असणार आहे. अर्थात यासाठी हार्दिक सज्ज असून त्याने आपण मैदानात उतरू तेव्हा मला चिअर करा असा संदेश फॅन्सला दिला आहे. त्याच्या याच कमबॅकबाबत बोलताना टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ भावूक झाला. हार्दिकचा प्रवास प्रेरणादायी असून त्याच्यावर बायोपिक बनवण्याची मागणीही कैफने केली.

मोहम्मद कैफ याने हार्दिक पंड्याचा संघर्ष आणि त्याच्या कमबॅकवर एक भावूक करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘हार्दिक पंड्या म्हणायचा मी माझे अश्रू कुणाला दाखवले नाही, कारण लोकांनी त्याचाही आनंद लुटला असता. त्याने काय झेलले हे तोच सांगू शकतो. चाहत्यांनी त्याला अपमानित केले, मैदानात हुर्या उडवली. त्याच्यावर टीका केली. एक खेळाडू म्हणून अपमानित होणे खूप वेदनादायक असते. खेळाडूला संघातून वगळा, पण अपमानित होऊन पुढे खेळत राहणे खेळाडूसाठी खूप कठीण असते. ती वेदना, पीडा मनात ठेऊन तो लढत राहिला आणि त्याने कमबॅक केले, असे कैफ म्हणाला.

मानसिक छळ होत असताना हार्दिक वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याने गोलंदाजीने उत्तर दिले. क्लानसेची विकेट घेत वर्ल्डकप जिंकवला. नंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एडम झंपाला एकामागोमाग एक षटकार ठोकले. जंगलातील वाघासारखा तो एकटा चालत राहिला. जर कधी हार्दिक पंड्याच्या आयुष्यावर बायोपिक बनली तर त्याची कहाणी खेळाडूंना कमबॅकसाठी प्रेरणा देत राहील’, असे तो म्हणाला.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2025 मध्ये चांगली कामगिरी करेल असा विश्वासही कैफने व्यक्त केला. यंदाच्या हंगामात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ टॉप 4 मध्ये पोहोचले, हे निश्चित. चाहतेही त्याला पाठींबा देतील आणि रोहित शर्माही त्याची मदत करेन. हार्दिकने वाईट काळातही टीम इंडियाला दोन ट्रॉफी जिंकून देण्याची महत्त्वाची भूमिका निभावली, यातून हेच सिद्ध होते की तो मानसिकरित्या खूप खंबीर खेळाडू आहे, असेही कैफ म्हणाला.

सूर्याच्या नेतृत्वाखाली मुंबई भिडणार चेन्नईशी, कर्णधार हार्दिक पंड्याने दिली माहिती