अष्टपैलुत्वात पास; पण नेतृत्वात नापास! हार्दिक पंड्या सोशल मीडियावर होतोय ट्रोल

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने शुक्रवारी हैदराबादविरुद्धचा सामना आपल्या अष्टपैलू कामगिरीने जिंकण्याच्या दिशेने घोडदौड केली होती. मात्र, सेट झालेल्या तिलक वर्माला रिटायर्ड हर्ट करून स्वतः ही फलंदाजी करताना अखेरच्या षटकांत कच खाल्ली अन् मुंबईच्या हातातोंडाशी आलेला विजय निसटला. त्यामुळे अष्टपैलू कामगिरीत पास झालेला पंड्या संघाचे नेतृत्व करताना मात्र नापास ठरला. त्यामुळे आज दिवसभर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सचा हा कर्णधार भलता ट्रोल होताना दिसला.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने हैदराबादचा निम्मा संघ गारद करून गोलंदाजीत सरस कामगिरी केली होती. फलंदाजीमध्ये सूर्यकुमार यादव बाद झाल्यावर हार्दिक पंड्या मैदानात आला. त्यावेळी सामना पूर्णतः मुंबई इंडियन्सच्या हातात होता. मात्र, हार्दिकने खेळायला आल्यावर तिलक वर्माला मैदानाबाहेर काढले अन् मिचेल सॅण्टनरला फलंदाजीला बोलावले. हार्दिक पंड्याने 16 चेंडूंत नाबाद 28 धावा पटकाविल्या, मुंबई इंडियन्सला अखेरच्या षटकात विजयासाठी 22 धावांची गरज होती.

पहिल्या चेंडूवर हार्दिक पंड्याने षटकार लगावला. त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने दोन धावा काढल्या. त्यामुळे दोन चेंडूंत मुंबईला आठ धावा मिळाल्या होत्या. आता मुंबईला 4 चेंडूंत 14 धावांची गरज होती. हार्दिक 14 धावा करेल असे वाटत होते. मात्र, हार्दिक पंड्याला पुढच्या दोन चेंडूंत एकही धाव करता आली नाही अन् येथेच सामना मुंबईच्या हातातून निसटला, कारण त्यानंतर मुंबईला जिंकण्यासाठी 2 चेंडूंत 14 धावांची गरज होती आणि ते नो बॉलच्या मदतीशिवाय शक्य नव्हते.

या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हार्दिक पंड्याने एक धाव काढली. ही धाव काढल्यावर आपण मुंबईला विजयापर्यंत नेण्यात अपयशी ठरलो, हे हार्दिकला कळून चुकले. त्यामुळे धाव पूर्ण करण्यापूर्वीच रागाच्या भरात त्याने आपली बॅट मैदानात फेकून दिली अन् धाव पूर्ण केली. संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी असलेल्या खेळाडूची अशी अखिलाडूवृत्ती मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना आवडली नाही. त्यामुळे आता हार्दिक पंड्या जोरदार ट्रोल होत आहे