IPL 2025 – सलग दोन चेंडूवर दोनदा झाला झेलबाद, तरीही पंचांनी ट्रेव्हिस हेडला ठरवलं नाबाद, कारण…

मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये आयपीएलचा 33 वा सामना पार पडला. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून पाहुण्या हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा वानखेडेवर धावांचा पाऊस पाडतील असे वाटत असताना मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून त्यांना वेसण घातले.

पहिल्या 6 षटकामध्ये हेड आणि शर्माला अवघ्या 46 धावा करता आल्या. त्यामुळे पॉवरप्ले नंतर दोन्ही फलंदाजांवर फटकेबाजी करण्याचे दडपण आले. आठव्या षटकामध्ये पंड्याने अभिषेक शर्माला 40 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर ईशान किशन मैदानात आला. जुन्या संघाविरुद्ध किशनला मोठी खेळी करता आली नाही आणि तो आल्या पावली 2 धावांवर माघारी परतला. त्यानंतर नितीश रेड्डी आणि ट्रेव्हिस हेड ही जोडी जमली. याच दरम्यान ट्रेव्हिस हेड दोनदा झेलबाद झाला, मात्र पंचांनी त्याला नाबाद ठरवले.

दहव्या षटकामध्ये पंड्या गोलंदाजीला आला. पहिल्या चेंडूवर हेडने एक धाव घेतली आणि तो नॉन स्ट्राईकला गेला. त्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव गेला आणि तिसऱ्या चेंडूवर रेड्डीने एक धाव घेत हेडला स्ट्राईक दिली. चौथ्या चेंडूवर हेडने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सीमारेषेवर विल जॅक्स याने त्याचा कॅच पकडला.

हे वाचा – रोहितची खेळी एकेका धावेने वाढतेय

हेडसारख्या विस्फोटक खेळाडूची विकेट पडल्याने मुंबईच्या खेळाडूंसह वानखेडेवर उपस्थित प्रत्येक चाहत्याने जल्लोषाला सुरुवात केली. मात्र हा जल्लोष काही क्षणांचाच ठरला. तिसऱ्या पंचांनी हा नो बॉल असल्याचे सांगितले, त्यामुळे हेडला जीवदान मिळाले. पुढच्या चेंडूवरही हेडने जोरात फटका मारला आणि मिचेल सँटनरने सीमारेषेवर त्याचा कॅच पकडला. पण नियमाप्रमाणे नो बॉलचा पुढचा चेंडू फ्री हिट असल्याने इथेही हेडला जीवदान मिळाले.

अर्थात दोनदा जीवदान मिळूनही हेडला याचा फायदा उठवता आला नाही. बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवत विल जॅक्स याने त्याला बाद केला. हेडने बाद होण्यापूर्वी 29 चेंडूत 28 धावांची संथ खेळी केली.

मुंबईला वानखेडेवर विजयाचा जॅकपॉट, विल जॅक्सची अष्टपैलू कामगिरी; मुंबईचा प्रथमच सलग विजय