डिग्री नसताना डॉक्टरने केल्या 44 शस्त्रक्रिया, आरोग्य विभागाच्या डोळ्यांवर पट्टी

हरियाणाच्या हिसार जिह्यातील सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरकडे कोणतीही डिग्री नसताना त्याने 44 नेत्र शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक बाब उघड झालीय. मोठय़ा प्रमाणात डोळ्याच्या शस्त्रक्रिया होतात. सध्या या ‘मुन्नाभाई’ डॉक्टरला डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यास मनाई करण्यात आली आहे. डॉ. विजय असे त्याचे नाव आहे.

आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय यांना नेत्र शल्यचिकित्सक म्हणून नियुक्त केले होते. मात्र त्यांच्याकडे कोणतीही डिग्री नव्हती. त्यामुळे नॅशनल प्रोग्रॅम फॉर द कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेसच्या (एनपीसीबी ) उपसंचालकांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्यास बंदी घातली. हा आदेश येईपर्यंत डॉ. विजय यांनी 44 शस्त्रक्रिया केल्या होत्या. डॉ. विजय यांच्याकडे कोणतीही डिग्री नाही, तसेच त्यांची परीक्षा पूर्ण झालेली नाही, असे एनपीसीबीने सांगितले. हिसारच्या जिल्हा सिव्हील रुग्णालयात 3 नेत्रशल्यचिकित्सकच्या पोस्ट आहेत. मात्र सध्या एकही नेत्र शल्यचिकित्सक सेवेत नाही. त्यामुळे ज्या रुग्णालयात एकेकाळी वर्षाला एक हजाराहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया व्हायच्या, तिथे मागील 11 महिन्यांत फक्त 71 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.