
राज्य सरकारने आयोजित केलेल्या ‘चित्रपताका’ या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवाचा दुसरा दिवस परिसंवाद, कार्यशाळा आणि मुलाखतीने रंगला. प्रसिध्द दिग्दर्शक हंसल मेहता यांची रंगतदार मुलाखत अभिनेते, कवी किशोर कदम यांनी घेतली. मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाहीत, अशी तक्रार केली जाते. मात्र, प्रेक्षकांची गर्दी आणि चित्रपटाची कमाई याचा विचार करून चित्रपट बनवू नयेत, असे स्पष्ट मत मेहता यांनी व्यक्त केले. चांगले चित्रपट बनवत राहा, प्रेक्षक स्वतःहून शोधत येतील, असा सल्लाही हंसल मेहता यांनी दिला.
नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ बनवताना चित्रपट शंभर कोटीची कमाई करेल असा विचार करून बनवला नव्हता. सगळय़ा नवोदित कलाकारांना घेऊन त्यांनी आपल्याला हवा तसा चित्रपट बनवला होता. चित्रपट आवडल्यावर प्रेक्षकांनी गर्दी केली, असे हंसल मेहता म्हणाले.
असा उलगडला जीवनप्रवास
उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘विहीर’ चित्रपटाचा आपल्यावर किती प्रभाव पडला, याची आठवण सांगताना माझा पहिला चित्रपट मी ‘विहीर’ पाहिल्यावर बनवला असता तर अधिक चांगला करता आला असता, असा विचार चित्रपट पाहिल्यावर आपल्या मनात चमकून गेला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. टेलिव्हिजनवरील ‘खाना खजाना’सारख्या शोपासून सुरुवात झाल्याचे ते म्हणाले.