नराधम विशाल गवळीला फासावर लटकवा! कल्याणच्या न्यायालयाबाहेर नागरिकांची स्वाक्षरी मोहीम

चिमुकलीवर अत्याचार करून नंतर तिची निघृण हत्या केलेल्या नराधम विशाल गवळीला फासावर लटकवा अशी मागणी करत आज शेकडो कल्याणकर रस्त्यावर उतरले. कल्याणच्या न्यायालयाबाहेर स्वाक्षरी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेत नागरिकांनी गवळीविरोधात संताप व्यक्त केला. रेल्वे स्थानक, बस आगार तसेच परिसरातून येणाऱ्या प्रवाशांनी या मोहिमेत सहभाग घेत गवळीच्या कृत्याचा निषेध केला. संकलित स्वाक्षऱ्यांचे निवेदन राष्ट्रपती, सर न्यायाधीश, राज्यपाल तसेच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पाठविले जाणार आहे.

कल्याण पूर्वेतील एका 13 वर्षांच्या आरोपी बालिकेवर अत्याचार करून विशाल गवळीने तिची निघृण हत्या केली होती. याप्रकरणी गवळीसह त्याची पत्नी साक्षी गवळी यांना आज न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने आरोपींना आज सकाळी न्यायालयात हजर केले जाणार होते. त्यापूर्वीच माजी नगरसेवक नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली निर्भया बचाव समितीच्या कल्याण शाखेने गवळी याला फासावर लटकवा या मागणीसाठी गवळी सह्यांची मोहीम राबवली. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी न्यायालयाच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हत्येच्या दिवशी नराधमाने कोणाला फोन केले? याचा उलगडा होणार

पोलीस तपासात विशालने दिलेल्या जबानीत आपला मोबाईल कसारा घाटात फेकल्याची माहिती यापूर्वी दिली होती. मात्र आता त्याने गुन्ह्यातील मोबाईल शेगाव येथील एका लॉज मालकाला पाच हजारात विकल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी संबंधित लॉज मालकाशी संपर्क करून हा मोबाईल आणि सीमकार्ड जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हत्येच्या दिवशी विशालने कोणाकोणाला फोन केले होते याचा उलगडा होणार आहे. विशाल गवळीने गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन दुचाकी ताब्यात घेतली आहे. दरम्यान, विशालचे वकील अॅड. संजय धनके यांनी आपल्याला व आपल्या कुटुंबाला धमक्या येत असल्याने पोलीस संरक्षणाची मागणी केली असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.