बीडनंतर परभणीत उठाव; संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या… सर्वपक्षीय मोर्चाची मागणी

बीडनंतर परभणीत उठाव झाला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या आणि धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, अशी जोरदार मागणी परभणीत काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. हजारोंच्या उपस्थितीत निघालेल्या या मोर्चाला व्यापाऱयांनी आपापली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त पाठिंबा दिला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पवनचक्कीच्या वादातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अमानुष हत्या करण्यात आली. याच प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्हय़ात मंत्री धनंजय मुंडे यांचा खास वाल्मीक कराड हा सीआयडीला शरण आला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना फासावर लटकवा आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, या प्रमुख मागणीसाठी आज परभणीत सर्वपक्षीय, सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला. जिंतूर रोडवरील नूतन शाळेपासून मोर्चाला प्रारंभ झाला.

सुभाष रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला. या मोर्चात शिवसेना खासदार संजय जाधव, खासदार बजरंग सोनवणे, भाजपचे आमदार सुरेश धस, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार राजेश विटेकर, नरेंद्र पाटील, ज्योती मेटे यांच्यासह देशमुख कुटुंब सहभागी झाले होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गुंडगिरीला वेसण घाला

शिवसेना खासदार संजय जाधव यांनी परळीत थर्मलच्या राखेतून होणाऱया अवैध धंद्यावर आवाज उठवला. या गुंडगिरीचे लोण गंगाखेडपर्यंत पोहोचले असल्याचे ते म्हणाले. गोदाकाठावरील वाळूच्या तस्करीला रोखण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. संतोष देशमुख यांच्या मारेकऱयांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

वाल्मीक कराडच मास्टरमाईंड, पण त्याच्यावर अद्याप गुन्हा नाही

वाल्मीक कराडच या प्रकरणातील मास्टरमाईंड आहे. पण अजून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आरोपींचे सीडीआर तपासून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले.

अजितदादा, क्या हुआ तेरा वादा!

मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणालाही सोडणार नाही असे म्हटले होते. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आपल्या खास शैलीत ‘अजितदादा, क्या हुआ तेरा वादा’ असे म्हणत त्या शब्दाची आठवण करून दिली. धनंजय मुंडे यांना मंत्री करण्याएवढी त्यांची पात्रता नाही, तरीही त्यांना मंत्री का बनवले, असा सवालही त्यांनी केला. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ कॉल आकाच्या आकांनी पाहिला असेल तर त्यांनाही जेलमध्ये जावे लागेल, तयारी करा असा टोला लगावतानाच त्यांनी आरोपींना ‘मकोका’ लावण्याची मागणी केली. बीड, परभणी आणि धाराशिव जिल्हय़ांतील पीकविम्याच्या घोटाळय़ावरही त्यांनी भाष्य केले. या प्रकरणात आमदार राजेश विटेकर यांनीही आवाज उठवला पाहिजे, असा शालजोडीतलाही आमदार धस यांनी हाणला. सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी लवकरच परभणीत येणार असल्याचेही ते म्हणाले.

आज पुण्यात जनआक्रोश मोर्चा

बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी (दि. 5) शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि सर्वधर्मीय समाजाकडून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता लाल महाल येथून या मोर्चाला प्रारंभ होईल. फडके हौद, दारूवाला पुल, अपोलो थिएटर, के.ई.एम हॉस्पिटल, समर्थ पोलीस स्टेशन मार्गे हा जनआक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत.

…तर धनंजय मुंडेंना फिरू देणार नाही – जरांगे

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबाला धमक्या देण्यात येत आहेत. धनंजय देशमुख यांना तर पोलीस ठाण्यातच धमकी देण्यापर्यंत मजल गेली आहे. यापुढे देशमुख कुटुंबाच्या केसालाही धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना परळीतच काय, महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. कराडवर कठोर कारवाई अपेक्षित असताना त्याला तळहातावरच्या फोड्याप्रमाणे जपण्यात येत आहे, असा आरोप करताना सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडतात, असा प्रश्न त्यांनी विचारला.