लेख – इस्रायलने बदला घेतला; पुढे काय?

इस्रायलच्या अभेद्य सुरक्षाकवचाला भेदून आणि मोसाद या जगप्रसिद्ध गुप्तचर यंत्रणेच्या हातावर तुरी देऊन हमास या दहशतवादी संघटनेने गेल्या वर्षी इस्रायलवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत जोरदार आक्रमण केले आणि आजही हा संघर्ष सुरूच आहे, पण विविध देशांच्या मध्यस्थीने हा संघर्ष थांबवण्यासाठा प्रयत्न अंतिम टप्प्यात असताना इराणच्या नवीन अध्यक्षांच्या पदग्रहण समारंभप्रसंगी तेहरानमध्ये हमासचे प्रमुख इस्माईल हनिये यांना इस्रायलने कंठस्नान घातले. या बदला आणि प्रतिबदला यामुळे हा संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हमास-इस्रायलमधला संघर्ष एका टोकाला पोहोचला आणि त्याचे प्रत्यंतर तेहरानमध्ये झालेल्या एका हवाई हल्ल्यामध्ये दिसून आले. यामध्ये हमासचे प्रमुख नेते जे स्वतःला पंतप्रधान म्हणवून घेत असत ते इस्माईल हनिये यांच्यासह त्यांचा अंगरक्षक यांना कंठस्नान घालण्यात आले. हा हल्ला इस्रायलनेच केला असे तेथील गुप्तहेर संघटनांचे म्हणणे आहे. एक प्रमुख पॅलेस्टिनी राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून इस्माईल हनिये यांचा झालेला उदय हा एक महत्त्वाचा टार्ंनग पॉइंट होता. त्यांनीच हमासचे संघटन केले आणि इस्रायलवर 8 ऑक्टोबरच्या मध्यरात्री मोसादच्या हातावर तुरी देऊन छुपा हल्ला करविला होता. त्यामुळे ते इस्रायलच्या हिट लिस्टवर होते. एक मोस्ट वॉन्टेड अतिरेकी म्हणून अमेरिकेलाही ते हवे होते. इराणच्या नवीन अध्यक्षांच्या पदग्रहण समारंभप्रसंगी तेहरानमध्ये प्रमुख निमंत्रित म्हणून हनिये उपस्थित होते. खरे तर त्यांचा मुक्काम कतारमध्ये असतो, परंतु नियतीने त्यांच्या समोर काही वेगळेच वाढून ठेवले होते. इकडे युद्धविरामाच्या गोष्टी चालू होत्या, शांतता कशी प्रस्थापित करता येईल यावर कतारमध्ये बोलणी चालू होती आणि तिकडे मात्र त्यांच्या जीवनालाच पूर्णविराम देण्याची सर्व तयारी झाली होती. हनिये ज्या घरात उतरले होते त्या घरावर इस्रायलच्या विमानांनी अचूक हल्ला केला आणि 8 ऑक्टोबरच्या भ्याड आक्रमणाचा वचपा काढला.

हमासच्या राजकीय भवितव्याचे सर्वेसर्वा आणि केंद्रबिंदू असलेले इस्माईल हनिये यांचा मध्यपूर्वेच्या राजकीय क्षितिजावरून अचानक अस्त झाल्यामुळे बदला आणि प्रतिबदला, हल्ला आणि प्रतिहल्ला याचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे, परंतु दुष्टचक्र मात्र संपलेले नाही. उलट या वर्तुळाचा परिघ आता अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. कारण इराणचे नेते आयातुल्ला खामेनी यांनीही बदला घेण्याची भाषा केली आहे. त्याचे काय परिणाम होतील? या युद्धात आता मध्यपूर्वेतील इराण, इजिप्त, तुर्कस्तान इत्यादी देश उतरण्याची शक्यता आहे. तसेच पॅलेस्टाईनच्या बाजूने जे कोणी उभे राहतील ते सारे इस्रायलच्या विरोधात काम करतील. खुद्द अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी याबद्दल काहीही प्रतिक्रिया आणि भाष्य करण्यास नकार दिला असला तरीदेखील अमेरिकेने जाहीर केलेल्या मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांमध्ये हनिये यांचा समावेश होता हेही विसरता कामा नये. इस्रायलने आजवर इराणवर केलेल्या गुप्त कारवायांमध्ये चार अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत. तसेच इराणला आपल्या सुरक्षा यंत्रणेतील अनेकांना गमवावे लागले आहे. तथापि हनियेंना ज्या पद्धतीने टिपण्यात आले त्यातून इस्रायल आणि मोसाद यांची युद्धपद्धती, युद्धयंत्रणा किती प्रगत आहे याची साक्ष जगाला पटली.

इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादला इस्माईल हनियेंच्या सर्व हालचालींची माहिती होती. आताही त्यांच्या निवासाची संपूर्ण बारीकसारीक माहिती मिळविली आणि त्यांचे लोकेशन आपल्या गुप्त यंत्रणांना पाठविले. त्यामुळे त्यांच्या ठावठिकाण्यावर अचूक मारा करणे इस्रायलला शक्य झाले. हमासच्या राजकीय पटलावर झालेला इस्माईल हनिये यांचा उदय आणि अस्त पाहता, खरे तर त्यांनी मध्यरात्री केलेला इस्रायलवरील हल्ला ही एक मोठी चूक होती. या पद्धतीचा कट रचताना दहा वेळा विचार करणे आवश्यक होते, पण त्यांनी तसे केले नाही. याऐवजी त्यांनी शांतता व सुसंवाद असा मार्ग स्वीकारला असता तर ही वेळ आली नसती. इस्रायलने प्रथम त्यांच्या कुटुंबातील 14 लोकांना यमसदनास पाठविले आणि अखेर म्होरक्या असलेल्या इस्माईल हनिये यांचाही काटा काढला. त्यांचे हे गनिमी काव्याचे तंत्र चकित करणारे ठरले आहे. हिजबुल्लाचा एक मुख्य कमांडर फुआद शुकर यांना यमसदनी धाडल्यानंतर दुसऱयाच दिवशी इस्माईल यांना मोसादने टिपले.

गाझा पट्टी कोणाची?

हनिये यांच्या हत्येनंतर युद्धाच्या तिसऱया टप्प्यामध्ये इस्रायलने दक्षिण गाझा पट्टीत मुंसडी मारली आहे. आता इस्रायलचा प्रयत्न संपूर्ण गाझा पट्टीवर ताबा मिळविण्याचा आहे, पण जग त्याला किती मान्यता देईल हा खरा प्रश्न आहे. कारण पॅलेस्टाईनचे राजकीय अस्तित्व नाकारता येणार नाही.

इस्माईल यांच्या हत्येमुळे इराणलासुद्धा युद्धामध्ये गोवण्याचा इस्रायलने प्रयत्न केला आहे काय? आता जर इराणने प्रत्यक्ष बदल्याची कारवाई केली तर युद्धाचे वर्तुळ अधिक विस्तारण्याचा धोका आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील युद्धाचे ढग अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इस्माईल हे हमासच्या दृष्टीने प्रतिकाराचे व संघर्षाचे प्रतीक बनतील आणि असंख्य पॅलेस्टिनी त्यांचे नाव घेऊन इस्रायलबरोबर संघर्ष करण्यासाठी पुन्हा तयार होतील, अशी एक शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्माईल हनियेंची हत्या विश्वासघातकी झिओनिस्ट हल्ला आहे असे इराणमधील कडव्या नेत्यांना वाटते. त्यामुळे इराणची पुढची चाल पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

अमेरिका सध्या तटस्थ आहे. याबद्दल काहीही प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही. परंतु अमेरिकेची याला मूक संमती आहे असे म्हणता येईल का? तिसरी गोष्ट म्हणजे या प्रकारानंतर रशिया, तुर्कस्तान, इजिप्त हे देश काय भूमिका घेतात यावर युद्धक्षेत्र किती लांबते हे ठरणार आहे. युद्धाचे परिघक्षेत्र लांबू नये, युद्ध थांबावे, युद्धविराम ताबडतोब घडावा असे भारतासह जगातील प्रमुख नेत्यांना वाटते. पण दुर्दैवाने अमेरिकेची भूमिका दुटप्पी राहिली आहे. नेतान्याहू यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. भावी अध्यक्ष निवडणुकीतील दोन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस दोघांना लोटांगण घालून त्यांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला. यापैकी कमला हॅरिस पुन्हा निवडून आल्या तर त्या बायडेन यांचे धोरण चालू ठेवतील, पण ट्रम्प पुढे आले तर ते मात्र इस्रायलला युद्ध सामर्थ्य किती पुरवतील हा प्रश्न पडतो.

बदला आणि प्रतिबदला, हल्ला आणि प्रतिहल्ला हे दुष्टचक्र किती काळ चालेल? त्यामुळे हा संघर्ष जगातील तिसऱया महायुद्धाची नांदी ठरले काय? युद्धाचे ढग मध्यपूर्वेत सर्वदूर पसरले तर मग युद्ध आवरणे अवघड जाईल. हमास-इस्रायल आणि नाटो व रशिया यातील संघर्षाचे राजकारण पाहता असे दिसते की, मध्यपूर्वेतील बहुतेक देशांमध्ये अस्थिरता आहे. कारण तेथे राज्य करणारे राज्यकर्ते आणि शासन चालविणारे दहशतवादी गट अशा दोन भिन्न यंत्रणा आहेत. राज्य एकाचे चालते व सरकार मात्र दहशतवादी चालवितात. अशाच प्रकारचे राजकारण सुएझ कालव्यात हुथी बंडखोर करीत आहेत. या प्रकारच्या यंत्रणा लोकशाही देशामध्ये जेव्हा वाढतात, तेव्हा तेथील लोकशाही व्यवस्था मोडकळीस येते. खरे तर मध्यपूर्वेतील देशामध्ये अंतर्गत कटकारस्थाने व यादवी तसेच बंडाचे प्रकार टाळून स्थिर लोकशाही सरकार देण्यावर भर दिला पाहिजे. खुद्द नेतान्याहू यांनाही निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे त्यांचे राजकारणसुद्धा लोकांच्या किती पचनी पडले हा खरा प्रश्न आहे. तूर्त नेतान्याहू यशस्वी ठरले आहेत. परंतु त्यांनाही पुढे निवडणुकीचा सामना करावयाचा आहे. परंतु भविष्यकाळात काय घडेल हे आज सांगता येत नाही. पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीची पुनर्रचना करायचे ठरवले तर त्याला 15 वर्षे लागतील व 90 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागेल. तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व गटांना एकत्र आणून तटस्थदृष्टीने प्रश्न सोडविला पाहिजे आणि शांतता प्रस्थापित केली पाहिजे. कतारमध्ये चालू असलेली युद्धाची बोलणी यापुढे किती काळ चालू राहतील? टिकतील की नाही ही शंका आहे. परंतु आता नव्या मध्यस्थांनी पुढाकार घ्यावा आणि हे युद्ध थांबवावे नाहीतर मध्यपूर्वेतील हे गडगडणारे ढग प्रत्यक्षात बरसले तर त्यामुळे जग युद्धाच्या खाईत लोटले जाईल याची चिंता वाटू लागते.