हज यात्रेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 1,301 यात्रेकरूंचा उष्माघाताने मृत्यू

यंदा सौदी अरेबियात गरमीने कहर माजवला आहे. उष्णतेच्या पाऱ्यानं पन्नाशी ओलांडल्यानं हज यात्रेला गेलेल्या यात्रेकरूंवर याचा भीषण परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. हज यात्रेला गेलेल्या मृत यात्रेकरूंचा आकडा वाढतच चालला असून, आतापर्यंत 1,301 यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृतांमध्ये 98 हिंदुस्थानी यात्रेकरूंचा समावेश आहे, गंभीर बाब म्हणजे यामध्ये 83 टक्के यात्रेकरू अनधितकृत होते. दरम्यान, 95 यात्रेकरूंवर सौदीची राजधानी रियाधमधील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सौदीतील एका मंत्र्यानं दिली आहे.

कागदपत्रांअभावी मृतांची ओळख पटवण्यास विलंब

स्थानिक वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, अनेक यात्रेकरूंकडे कागदपत्रं नसल्यानं मृतांची ओळख पटवण्यास विलंब झाला. मक्कामध्येच मृतांचा दफनविधी करण्यात आला, मात्र याबाबत कोणतीही सविस्तर माहिती मिळाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये इंडोनेशियातील 165, हिंदुस्थानातील 98 आणि जॉर्डन, ट्युनिशिया, मोरोक्को, अल्जेरिया आणि मलेशियामधील डझनाहून अधिक यात्रेकरूंचा समावेश आहे. दोन अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाल्याचं देखील वृत्त आहे.

मृतांमध्ये सर्वाधिक इजिप्शियन यात्रेकरू

मक्कामध्ये उष्णाघातामुळे आतापर्यंत मरण पावलेल्या यात्रेकरूंमध्ये सर्वाधिक यात्रेकरू इजिप्शियन आहेत. सुमारे 660 हून अधिक इजिप्शियन नागरिकांचा हज यात्रेदरम्यान उष्णाघाताने मृत्यू झाला. यापैकी केवळ 31 यात्रेकरूच नोंदणीकृत होते. अन्य यात्रेकरू अनधिकृतरित्या यात्रेला आले होते. याप्रकरणी अनधिकृत यात्रेकरूंना सौदी अरेबियात पाठवणाऱ्या 16 ट्रॅव्हल्स कंपन्यांचे परवाने इजिप्तनं रद्द केले आहेत.

इजिप्तमधील स्थानिक टूरिस्ट एजंट आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांना पर्यटक व्हिसावर हज यात्रेसाठी पाठवतात. यामुळे नोंदणीअभावी या यात्रेकरूंना हजची सुविधा मिळत नाही.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच यात्रेकरूंना त्रास

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीच तीव्र उष्णतेमुळे यात्रेकरू बेशुद्ध झाले. काहींना उलट्या होऊन ते कोसळले. हज यात्रेचा इतिहास पाहता यात्रेत यात्रेकरूंचा मृत्यू ही कायमचीच गोष्ट ठरली आहे. दरवर्षी 20 लाखाहून अधिक लोक पाच दिवसांच्या यात्रेसाठी सौदी अरेबियाला जातात. अशा गर्दीमुळे यात्रेच्या ठिकाणी चेंगराचेंगरी आणि साथीचे रोग अशाने मृत्यू झाल्याच्या घटना घडतात. यंदा मात्र उष्माघातामुळे परिस्थिती फारच गंभीर बनल्याचं सांगितलं जात आहे.