ऑनलाईन मागवलेला हेअर ड्रायर चेक करण्यासाठी चालू केसा असता हेअर ड्रायरचा हातातच मोठा स्फोट झाला. या स्फोटात महिलेच्या दोन्ही हातांची बोट आणि पंजाला गंभीर इजा झाली आहे. ही धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये घडली असून सदर महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित महिला माजी सैनिक पपन्ना यरनाल यांची पत्नी आहे.
कर्नाटकमधील बागलकोटमध्ये सदर घटना बुधवारी, 20 तारखेला घडली. राजेश्वरी नामक एका महिलेने ऑनलाईन हेअर ड्रायर मागवला होता. DTDC या कुरिअर कंपनीच्या माध्यामातून Made In China हेअर ड्रायर घेऊन एक कुरिअर बॉय राजेश्वरी यांच्या घरी आला. मात्र, राजेश्वरी त्यावेळी घरी नव्हत्या. त्यामुळे तिने शेजारी राहणाऱ्या बासम्मा यारानल यांना हेअर ड्रायर घेण्यास सांगितले. त्याच बरोबर हेअर ड्रायरची तपासणी करण्यासही सांगितले. बासम्मा यांनी हेअर ड्रायर तपासण्यासाठी चालू केला असता त्याचा हातातच मोठा स्फोट झाला. या भयंकर स्फोटामुळे बासम्मा यांना दोन्ही हाताचे पंजे गमावावे लागले आहेत. घटना घडताच बासम्मा यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे हेअर ड्रायर ऑनलाईन मागवलेल्या राजेश्वरी या महिलेने हेअर ड्रायर मागवला नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत.