
पुणे शहरातील हडपसर परिसरातील फ्लॅटमध्ये तब्बल 300 मांजरी पाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोसायटीतील नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हडपसर पोलीस व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात मांजरीचा वावर असल्याचे दिसून आले. मांजरीच्या विष्ठेने प्रचंड दुर्गंधी पसरल्याने फ्लॅटधारकाला 48 तासांत सर्व मांजरींना दुसरीकडे हलवून योग्य देखभाल करण्याच्या सूचना पोलिसांनी संबंधितांना दिल्या आहेत.
हडपसरमधील मार्वल बाऊण्टी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत फ्लॅट नंबर सी-901 मध्ये रिंकू भारद्वाज व रितून भारद्वाज राहायला आहेत. त्यांनी घरात मोठ्या प्रमाणात मांजरी पाळल्यामुळे दुर्गंधीचा त्रास होत असल्याची तक्रार रहिवाशांनी पोलिसांकडे केली. त्यानुसार हडपसर पोलिसांसह जिल्हा पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी फ्लॅटधारकांनी सहकार्य न करता अधिकाऱ्यांना दाराबाहेर ताटकळत ठेवले. वारंवार फोन करून संभाषण केल्यानंतर दोन तासांनंतर त्यांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला. त्यावेळी फ्लॅटमध्ये रिंकू भारद्वाज आणि चार महिला कर्मचारी होत्या. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना मांजरींना रेबीज लसीकरण केल्याची विचारणा केली.
मांजरींना ना लसीकरण, ना नसबंदी
■ मांजरींना रेबीज लसीकरण केले नसल्याचे स्पष्ट असून, त्यांची नसबंदीही केली नसल्याचे स्पष्ट झाले. साडेतीन बीएचके फ्लॅटमध्ये 300 पेक्षा जास्त मांजरी फ्लॅटमध्ये आढळून आल्या. यापैकी काही मांजरी गर्भवती व काही मांजरींना पिल्ले असलेल्या दिसून आल्या. काही मांजरींना दुखापत झाल्याचे दिसून आले. फ्लॅटधारकाने मांजरींचे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय रेकॉर्ड ठेवले नाही. फ्लॅटमध्ये मांजरीची विष्ठा आढळून आल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. मांजरींना पुढील 48 तासांत हलविण्याच्या सूचना पोलिसांनी फ्लॅटधारकाला दिल्या आहेत.