
गुजरातमधील राजकोट येथील रुग्णालयातील सीसीटीव्ही हॅक केल्याप्रकरणी सांगलीतून दोघांना आणि सुरतमधून एकाला आज अटक करण्यात आली. आरोपींनी महिला रुग्णांचे व्हिडीओ ऑनलाइन विक्रीसाठी रुग्णालयाचे सीसीटीव्ही डिव्हाइस हॅक केले होते. रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात डॉक्टरांकडून महिला रुग्णांची तपासणी करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. हे व्हिडीओ ग्राहकांकडून पैसे कमावण्याच्या उद्देशाने टेलिग्राम आणि यूटय़ूबवर प्रसारित करण्यात आले. त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
राजकोट येथील पायल मॅटर्निटी होममधील सीसीटीव्ही व्हिडीओ प्रसारित झाल्यामुळे एकच खळबळ माजली. अखेर पोलिसांनी सुरतमधील परित धामेलिया आणि सांगलीतील वैभव माने आणि रायन परेरा यांना अटक केली. धामेलिया याला रुग्णालयातील सीसीटीव्ही पॅमेरा डिव्हाइस हॅक केल्याप्रकरणी तर उर्वरित दोन आरोपींना टेलिग्रामवर व्हिडीओ विकल्याप्रकरणी अटक करण्यात आली. धामेलियाने सीसीटीव्ही हॅक करण्याचे प्रशिक्षण परदेशी लोकांकडून घेतले होते. तसेच दिल्लीतील रहिवासी रोहित सिसोदिया याची याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
आरोपींनी रुग्णालयातील व्हिडीओ विकून लाखो रुपयांची कमाई केली. त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) आणि 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी प्रसारित केलेल्या व्हिडीओंमध्ये डॉक्टर महिलांची तपासणी करताना दिसतात. याशिवाय महिला कपडे बदलतानाची दृश्ये आरोपींनी सीसीटीव्ही हॅक करून व्हायरल केली. तीन यूटय़ूब चॅनलवरून याची जाहिरात केली जात होती. टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळवण्यासाठी 2000 रुपये आकारले जायचे.