घरगुती उद्योगांपासून लघुउद्योगांपर्यंत बचत गटांतील 1104 महिलांचे सक्षमीकरण

देशात आजही महिलांच्या सबलीकरणासाठी विविध प्रकारच्या संस्था कार्यरत आहेत. अशा संस्थांपैकी’हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांमधील ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण अभियान राबवले. उपजीविका आणि उद्योजकता विकास यांच्याद्वारे महिलांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. या प्रकल्पाद्वारे दोन्ही राज्यातील एकूण 1104 महिलांना मूलभूत कौशल्यांचे प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ दिले गेले तसेच महिलांच्या बचत गटांमार्फत उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात आली.

प्रकल्पाचा पहिला टप्पा छत्तीसगड, महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांमध्ये पार पडला. याद्वारे 85 बचत गटातील 969 महिलांना उपजीविकेच्या संधी पुरवल्या गेल्या ज्यामुळे या महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मोलाची मदत झाली.

प्रकल्पाचा दुसरा टप्पा महाराष्ट्रातील धाराशिव आणि बीड तसेच ओडिशा राज्यात ढेंकानाल आणि पुरी या जिल्ह्यांमध्ये पार पडला ज्याद्वारे 96 बचत गटांमध्ये कार्यरत 1104 महिलांच्या बळकटीकरणावर लक्ष केंद्रीत केले गेले. महिला आणि बचत गटांना तांत्रिक कौशल्य व प्रशिक्षण देऊन आणि प्रारंभिक निधी उपलब्ध करून घरगुती उद्योग, हस्तकला उद्योग, कृषी आणि कृषीआधारित लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले. याचबरोबर या महिला नव-उद्योजकांसाठी तज्ज्ञांमार्फत सातत्यपूर्वक मार्गदर्शन, आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण आणि मासिक पाळी जागरुकता सत्र यांचे आयोजन करण्यात आले.

बचतगटातील आपल्या सहकारी भगिनींच्या सहकार्याने डाळ गिरणीची स्थापना करणाऱ्या विद्या मोरे आपले अनुभव कथन करताना म्हणाल्या, ‘मला कोणताही व्यवसाय सुरू करण्याबाबत अजिबात माहिती नव्हती. झांशीची राणी एकल महिला बचत गट हा महिलांनी एकल महिलांसाठी स्थापन केलेला बचतगट आहे. आमच्या बचत गटातील भगिनींची एकजूट, सखोल प्रशिक्षण आणि हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाकडून आम्हाला मिळालेल्या मोलाच्या मदतीमुळे माझ्यातील आत्मविश्वास पुन्हा जागा झाला. हॅबिटॅटमुळे आम्हाला केवळ उपजीविकेचे साधनच नव्हे तर सन्मानाने जगण्याचे बळही मिळाले. जेव्हा स्त्रिया एकत्र येतात, तेव्हा काहीही अशक्य नसते याची जाणीव आम्हाला या उपक्रमामुळे झाली’.

उपक्रमाबद्दल आपले विचार व्यक्त करताना हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे राष्ट्रीय संचालक (नॅशनल डायरेक्टर) आनंद कुमार बोलीमेरा म्हणाले, ‘सक्षम आणि समृद्ध समुदाय उभा करण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण हे अतिशय महत्वाचे आहे. महिलांना कौशल्य, संसाधने आणि आत्मविश्वासाने सुसज्ज केल्यास, व्यवसायाचे आणि समाजाचे नेतृत्व करण्यास त्या पूर्णपणे सक्षम बनतात. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेसोबतच्या या भागीदारीने केवळ महिलांच्या वैयक्तिक जीवनातच बदल घडवला नाही तर, महाराष्ट्र आणि ओडिशामधील ग्रामीण भागात आर्थिक स्वावलांबनाची एक लाटदेखील निर्माण केली आहे. त्यातील काही महिला या हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाच्या घरकुल उपक्रमाच्या लाभार्थी आहेत. आता त्या उद्योजक आणि परिवर्तनकर्त्या भगिनी बनल्या असून खंबीर व स्वावलंबी समुदायांच्या उभारणीसाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांची यशोगाथा सामूहिक कृतीच्या सामर्थ्याची आणि त्यांच्यातील अपार क्षमतेची साक्ष आहे’.