ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांना दैनिक ‘सामना’चा समाज प्रबोधन पुरस्कार; उद्या कॉटन ग्रीन येथे होणार पुरस्काराचे वितरण

जळगाव मुक्ताईनगर येथील ह. भ.प. रवींद्र महाराज हरणे यांना दैनिक ‘सामना’चा ‘समाज प्रबोधन’ पुरस्कार जाहीर झाला आहे. वारकरी प्रबोधन महासमितीतर्फे उद्या, रविवारी सकाळी 9 वाजता कॉटन ग्रीन येथे भव्य संत संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत हरणे महाराज यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अकरा हजार रुपये, आकर्षक स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदाचे 25 वे वर्ष आहे.

राज्यातील अभ्यासू कीर्तनकार आणि संत साहित्याच्या अभ्यासकांमध्ये ह. भ. प. हरणे महाराज यांचे नाव आवर्जून घेतले जाते. मुक्ताई संस्थानमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे जे काही प्रयत्न यशस्वी झाले त्याचे श्रेय हरणे महाराज यांना जाते. आदिशक्ती मुक्ताबाई सोहळय़ाचा पांडुरंगाला असलेला नैवेद्य असो किंवा पालखी सोहळय़ाचे बदलते स्वरूप असो या सगळय़ा गोष्टी नावीन्याने पुढे नेण्याचे काम त्यांनी केले. मुक्ताईनगरमधील गोरगरीब विद्यार्थ्यांचा राहण्याचा प्रश्न सोडविण्यासोबत हजारो गोरगरीबांना तीर्थयात्रा घडवण्याचे काम त्यांनी केले.

अवघी मुंबापुरी दुमदुमणार

वारकरी प्रबोधन महासमितीतर्फे दरवर्षी विठुनामाचा जयघोष करत भव्य पालखी सोहळा आयोजित केला जातो. यंदा रौप्य महोत्सवानिमित्त समितीने रविवारी भव्य स्वरूपात संत संमेलन व पुरस्कार वितरण सोहळय़ाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने अवघी मुंबापुरी दुमदुमणार आहे. सकाळी 9 वाजता मुंबईतील हजारो वारकरी व दिंडय़ांच्या सहभागाने कॉटन ग्रीन येथील श्रीराम मंदिर येथून पालखी प्रस्थान होईल आणि दुपारी 2 वाजता वडाळा विठ्ठल मंदिर येथे सांगता होईल. त्यानंतर फाइव्ह गार्डन येथे माऊलींच्या अश्वाचा नयनरम्य रिंगण सोहळा होणार आहे. मुंबई नगरीत यंदा होणाऱ्या या महासोहळय़ास सर्व विठ्ठलभक्त मुंबईकरांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री आणि सचिव नाना निकम यांनी केले आहे.