नववर्षाला जिम्नॅस्टिकच्या गुणवत्तेची शोधमोहीम; वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंदिरात 11 जानेवारीला स्पर्धा

राज्यातील जिम्नॅस्टिक खेळातील गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी येत्या 11 जानेवारीला जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वडाळय़ाच्या भारतीय क्रीडा मंदिरात मुंबई शहर जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड जिह्यात जिम्नॅस्टिक खेळाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सतराव्या जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

या स्पर्धेत मुला-मुलींसाठी 8, 10, 12, 14, 16 वर्षांखालील आणि 16 वर्षांवरील असे वयोगट करण्यात आले आहेत. फक्त फ्लोअर एक्झरसाईझेवर प्रत्येक खेळाडूला कोणतेही 10 प्रकार सादर करायचे आहेत. त्यामुळे नवोदित खेळाडूंना या स्पर्धेत आपले क्रीडा कौशल्य सादर करण्याची संधी लाभणार आहे. यंदाच्या या गुणवत्ता शोधमोहिमेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील विविध शाळा आणि क्रीडा संस्थेतील 800 खेळाडूंनी आपली नोंदणी केली आहे. प्रत्येक खेळाडूला मुंबई शहर जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे श्रेणी प्रमाणपत्र, पदक दिले जाईल. या स्पर्धेला मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे आर्थिक पाठबळ लाभले आहे. संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.

नुकत्याच अमरावती येथे झालेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य आर्म रेसलिंग स्पर्धेत मुंबई पोलिसांनी बाजी मारली. या स्पर्धेत मुंबई पोलिसांनी 11 सुवर्ण पदकांची कमाई केली. तसेच 7 रौप्य आणि 2 कास्य पदके जिंकत मुंबई पोलिसांचा क्रीडा क्षेत्रातील दबदबाही दाखवून दिला. या स्पर्धेत पोलिसांच्या चंद्रवदन गवईने 2 सुवर्ण पदके पटकावली. तसेच कविरा काळे आणि श्वेतांजली मेश्राम यांनी दोन सुवर्ण जिंकले. त्याचप्रमाणे राहुल इंदुलकरने एका सुवर्णासह एक रौप्यही काबीज केले. त्याचप्रमाणे प्रदीप पाटील, सारिका चिटणीस, नूतन तिपुळे, ज्योती माने, कविता कोकरे, अश्विनी बिराजदार यांनीही पदकविजेती कामगिरी केली.