जिम, मैत्री आणि डेटिंग! Gen Z चा नवा फंडा…

काळ कुठलाही असो, आवड निवड जुळली की मैत्रीही पटकन होते. या मैत्रीचं पुढे घट्ट मैत्रीमध्ये आणि नंतर प्रेमात रुपांतर व्हायला वेळ लागत नाही. पूर्वीच्या काळी शाळा काॅलेजातील मैत्री प्रेम ते लग्न अशा वळणावर येऊन थांबायची. आता मात्र काळ बदलला आणि मैत्री आणि डेटिंग या दोन्हींच्या व्याख्याही बदलल्या. सध्याच्या घडीला येणारी जनरेशन नवीन ट्रेंडस् ठरवते आणि तेच ट्रेंडस् पुढे सुरु राहतात. सध्या जनरेशन झेड ही डेटिंगच्या एका नव्या ट्रेंडला सामोरी जात आहे. हा ट्रेंड म्हणजे जिममधील मैत्री, त्यानंतर प्रेम आणि डेटिंग…

सध्याच्या घडीला आता डेटिंगच्या व्याख्या बदलत चालल्या आहेत. खासकरून जेन झी साठी जिमच्या माध्यमातून आता डेटिंगचे पर्याय खुले होऊ लागले आहेत. 2024 मध्ये एका फिटनेस अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग अॅपने ‘इयर इन स्पोर्ट’ हा अहवाल प्रसिद्ध केला होता. अहवालातंर्गत, 58 टक्के लोकांनी सांगितले की त्यांनी फिटनेस ग्रुप्सद्वारे नवीन मित्र बनवले आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या प्रत्येक 5 जणांपैकी जनरेशन झेडमधील व्यक्तीने सांगितले की ते “व्यायामाद्वारे भेटलेल्या व्यक्तीसोबत डेटवर गेले आहेत. बारमध्ये काॅमन ओळख झालेल्या व्यक्तीपेक्षा जिममध्ये भेटलेल्या सोबत डेटिंगला जाण्याचे प्रमाण अलिकडे वाढताना दिसत आहे.

बदलत्या या पर्यायांमुळे जनरेशन झेडमध्ये जिममध्येच मैत्री करुन, त्याच व्यक्तीसोबत डेटिंगला जाण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आजच्या धावपळीच्या युगात फिटनेस फ्रीक असणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे इतर कुठेही भेटण्यापेक्षा जिम हा खूप बेस्ट पर्याय मानला जात आहे. भेटायचं जिममध्ये पुढे मैत्री झाल्यानंतर मग डेटिंगचा पर्याय अगदी खुला असतो. याच ट्रेंडला अनुसरून जिममध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जिममधील सहकाऱ्यांची ओळख होण्यासाठी विशेष फिटनेस ग्रुपही तयार करण्यात येत आहे. तसेच हा ग्रुप एकमेकांसोबत अॅक्टिव्ह कसा राहील हेही लक्ष देण्यात येत आहे.

आजही अनेक कंपन्यांमध्ये, घरुन काम करण्याचा पर्याय आहे. त्यामुळे इतरांशी संवाद साधण्यासाठी फिटनेसकडे सर्वांचा कल वाढू लागलेला आहे. याच फिटनेसचा आता पुढचा प्रवास डेटिंगकडे सुरु झालेला आहे.