ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

देशाचे 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी आज पदभार स्वीकारला. नवीन कायद्यांतर्गत नियुक्त झालेले ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत असणार आहे. याआधी मुख्य निवडणूक आयुक्त पद भूषविणारे राजीव कुमार 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले.

ज्ञानेश कुमार यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 20 राज्ये आणि पुद्दुचेरी या एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होणार आहेत. त्याची सुरुवात बिहारपासून होईल आणि अंतिम निवडणूक मिझोरममध्ये होणार आहे. ज्ञानेश पुमार यांच्याव्यतिरिक्त विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, मतदान हे देशसेवेच्या दिशेने पहिले पाऊल आहे. 18 वर्षे पूर्ण केलेल्या हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे. भारतीय संविधान, लोकप्रतिनिधी कायदा आणि त्यांच्या नियमानुसार निवडणूक आयोग नेहमीच मतदारांसोबत होता, आहे आणि राहील, अशी प्रतिक्रिया पदभार स्वीकारल्यानंतर ज्ञानेश यांनी दिली.