श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये गुरुपोर्णिमा उत्सव भक्तीभावात साजरा; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये गुरुपोर्णिमा उत्सव भक्तीभावात साजरा करण्यात आला. दत्तभक्तांच्या अलोट गर्दीत दिगंबरा दिगंबरा… च्या अखंड नामस्मरणात व श्री गुरुदेव दत्त च्या गजराने वातावरण भक्तीमय झाले होते. सुमारे एक लाख भाविक दर्शनासाठी आले होते. तसेच या वर्षात दुसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा होत असल्याने स्नानासाठी व गुरुपूजनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने आले होते. मुख्य मंदिर पाण्याखाली असल्याने नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आलेल्या उत्सव मूर्तीचे भाविकांनी दर्शन घेतले.

गुरूपौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे 4.30 वाजता काकडआरती व षोडशोपचार पूजा, सकाळी 7ते 12 यावेळेत अनेक भक्तांनी ‘श्री’ ना पंचामृत अभिषेक पूजा सेवा केली. दुपारी 12.30 वाजता श्रींचे उतासवमूर्तीला महापूजा करण्यात आली. दुपारी 3 वाजता ब्रह्मवृंदाकडून पवमान पंचसूक्तांचे पठण करणेत आले. तसेच मंदिरात धूप,दीप, आरती होवून इंदुकोटी स्तोत्र व पारंपारिक पदे म्हणणेत आली. गुरुपौर्णिमा व गुरुपूजन करण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून असंख्य भक्तगणांनी हजेरी लावली.

भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्त देव संस्थान मार्फत ठिकठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही व्यवस्था, दर्शन रांग, मुखदर्शन व्यवस्था, सूचना फलक, ध्वनीक्षेपक यंत्रणा,सुरक्षा रक्षक,आदी व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामपंचायत मार्फत पार्किंग, दिवाबत्ती आरोग्य व्यवस्था, जंतुनाशक फवारणी, साफ सफाई आदी सोयी सुविधा करण्यात आल्या होत्या. मेवा मिठाई खरेदी करण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली. मंदिर व परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त होता. गुरुपोर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याचे दत्त देव संस्थानचे अध्यक्ष वैभव काळूपुजारी, सचिव संजय उर्फ सोनू पुजारी सरपंच चित्रा सुतार ,उपसरपंच रमेश मोरे यांनी सांगितले. पोलीस यंत्रणा व वाहतूक पोलीस यांच्यासह चोख बंदोबस्त होता.