गीताबोध – समर्थन नको जाणीव हवी

>> गुरुनाथ तेंडुलकर

अथ द्वितीयोध्याय

संजय उवाच

तं तया कृपया आविष्टम् अश्रुपूर्णा कुलेक्षणम्

विषीदन्तम् इदम् वाक्यम् उवाच मधुसूदन ।।1 ।।

भावार्थ : कारुण्याने गदगदलेल्या आणि अश्रूंनी डबडबलेल्या व्याकुळ डोळ्यांच्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणाले की… पहिल्या अध्यायात केवळ अर्जुन एकटाच बोलत होता आणि भगवान श्रीकृष्ण त्याचं बोलणं शांतपणे ऐकत होते. अर्जुनाने आपल्याला ‘युद्ध का करायचं नाही’ याची अनेक कारणं सांगितली. श्रीकृष्णांनी ती सगळी कारणं शांतपणे ऐकून घेतली. मध्ये काहीही बोलले नाहीत की, त्याचं खंडणही केलं नाही.

मागील लेखांतून मी पुन: पुन्हा सांगितलं आहे की, भगवद्गीता हा ग्रंथ म्हणजे मानसशास्त्राचं क्रमिक पुस्तकच आहे. आपण सर्वसामान्य माणसं अगदी दैनंदिन जीवनातदेखील अर्जुनासारखंच वागत असतो. आपण अनेकदा आपल्या डोक्यात काहीतरी चुकीच्या कल्पना घेऊन त्याच कुरवाळत बसतो. आपले चुकीचे विचार, चुकीची वागणूकदेखील योग्यच आहे असं मानून स्वतला सिद्ध करण्यासाठी एक तत्त्वज्ञान तयार करतो. आपल्या वागणुकीचं समर्थन करतो. जेवढे आचार-विचार चुकीचे तेवढं समर्थन जोरदार असतं.

अलीकडेच नगरसेवकापासून ते आमदार आणि मंत्रीपदाची सत्ता उपभोगलेला आणि सत्तेचा दुरुपयोग करून गडगंज पैसा कमावलेला एक भ्रष्ट नेता ईडीच्या नोटिसीला घाबरून सत्ताधारी पक्षाच्या आडोशाला गेला. ज्या पक्षाने त्याला मोठं केलं त्या पक्षाशी गद्दारी करून केवळ स्वतची कातडी वाचवण्यासाठी त्याने पक्ष बदलला ही वस्तुस्थिती, पण… पत्रकारांना आणि जनतेला मात्र आपण असं का केलं याचं तो मोठमोठी भाषणं करून समर्थन करत होता. असे अनेक भ्रष्टाचार्य सध्याच्या सरकारमध्ये सामावलेले आपल्याला आढळतील. त्यांना सामावून घेणारे आणि वॉशिंग मशीनमधे घालून शुद्धीकरणाचं प्रशस्तीपत्र देणारे नेतेदेखील अशा भ्रष्ट माणसांना आपण का राजाश्रय देतो, याचं समर्थन करतात. नेत्यांचंच कशाला, अगदी दारू पिणारा माणूसदेखील आपण दारू का पितो, याची शंभर कारणं सांगतो. खोटं बोलणारा आपल्या खोटेपणाचं समर्थन करतो. व्यभिचार-भ्रष्टाचार करणारा प्रत्येक जण स्वतच्या वागणुकीसाठी एक तत्त्वज्ञानाचा कोष गुंफून त्यात स्वतच्या वागणुकीवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करतो. समाजात आपण हे सर्वत्र पाहतो. चोर चोरीचं समर्थन करतो. भेसळ करणारा व्यापारी “भेसळ केली नाही, तर या दराला माल विकणं परवडत नाही” असं सांगतो. हिंसा करणारा आपण केलेली हिंसा कशी योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो, तर अहिंसेचा पुजारी ‘अहिंसा हाच परमधर्म कसा आहे’ हे सांगत असतो. लाचलुचपत घेणारा अधिकारीदेखील आपण लाच घेतो त्यात काहीही चुकीचं नाही असं म्हणतो. मोठमोठे नेते, मंत्री-आमदार-खासदार कसे घोटाळे करतात, त्या मानाने आपण घेतलेली ही लाच अगदीच नगण्य आहे, असं त्याला वाटतं. कोर्टातील कोणताही खटला घ्या. दोन्ही पक्षांना त्यांचीच बाजू न्यायाची आहे असं वाटत असतं. प्रत्येक माणसाला आपलीच वागणूक योग्य आहे, असं वाटत असतं. किंबहुना ‘मी असा का वागतो?’ याची अनेक कारणं त्याच्याकडे उपलब्ध असतात.

धर्माच्या बाबतीतही हाच प्रकार आढळतो. आपलाच धर्म श्रेष्ठ असं मानून इतरांना तुच्छ लेखणारे अनेक तथाकथित धर्मगुरू आपण पाहतो. काही धर्मात तर जो आपल्या धर्माचा नाही त्याचं धर्मांतर करून त्याला आपल्या धर्मात घ्या, नाहीतर त्याला ठार मारा असंदेखील सांगितलं जातं. एकंदरीत काय, तर माणूस एका विशिष्ट विचारांना कवटाळून त्यानुसार आचरण करतो आणि त्या विचारांचं-आचरणाचं समर्थन करताना मोठय़ा तत्त्ववेत्याचा आव आणतो.

रणांगण सोडून पळून जाण्यासाठी कारणं सांगणारा अर्जुन एकटाच नाही. आपण सारे जण थोडय़ाफार फरकाने अर्जुनच असतो. आपल्या डोक्यात काही विचार अगदी फिट्ट बसलेले असतात किंवा बसवलेले असतात. त्यामुळे आपण तसेच वागतो. पहिल्या अध्यायात रणांगणात युद्धासाठी उतरलेला अर्जुन, शंख फुंकून युद्धाला आरंभ करण्याच्या तयारीतला अर्जुन अचानक भांबावला आणि युद्ध कसं अयोग्य आहे हे भगवान श्रीकृष्णांना समजावून सांगू लागला. भगवान श्रीकृष्णांनी एका कुशल मानसोपचार तज्ञाप्रमाणे त्याला पूर्ण बोलू दिलं. त्याच्या मनातले खदखदणारे सगळे विचार बाहेर पडल्यानंतरच बोलायला सुरुवात केली.

श्री भगवान उवाच

कुत त्वा कश्मलम् इदम विषमे समुपस्थितम् ।

अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरम् अर्जुन ।। 2 ।।

क्लैव्यं मा स्म गम पार्थ न एतत् त्वयि उपपद्यते ।

क्षुद्रं हृदयदौर्बल्यम् त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप ।। 3 ।।

भावार्थ : हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? थोरांनी कधीही न आचरलेले आणि स्वर्गप्राप्ती न करून देणारे हे तुझे विचार अजिबात योग्य नाहीत. हे विचार तुला कोणत्याही प्रकारची कीर्ती मिळवून देणार नाहीत. उलट रणांगणातून भीतीने पळून गेल्याबद्दल तुझी अपकीर्तीच होईल. हे पार्था, तुझ्यासारख्या सर्वेत्तम धनुर्धराला अंतकरणाचा हा दुबळेपणा योग्य नाही. तुझी ही वागणूक तुझ्या आजवरच्या लौकिकाला शोभणारी नाही. यात कोणत्याही प्रकारचा पुरुषार्थ नाही. म्हणूनच हा षंढपणा सोड आणि युद्धाला उभा रहा.

भगवान श्रीकृष्णांनी अगदी थोडक्यात, पण कडक शब्दांत अर्जुनाची कानउघाडणी केली आहे. त्याचा पुरुषार्थ जागृत करण्यासाठी त्याला चक्क ‘क्लैब्यं मा स्म गम’ म्हणजे ‘हा षंढपणा सोड’ असं खडसावलं आहे.

एखाद्या उनाड-टपोरी शाळकरी विद्यार्थ्याला मुख्याध्यापकांच्या समोर उभं केल्यानंतर त्याची जशी कानउघाडणी केली जाते तशाच प्रकारची कानउघाडणी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाची केली आहे. पण… पण मुख्याध्यापकांनी एकदा केवळ कानउघाडणी करून उनाड विद्यार्थी सुधारतात का? दारू पिऊ नका. तुमच्या प्रकृतीला ती घातक आहे, असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर दारुडे दारू सोडतात का? गुण्यागोविंदाने राहा. भांडू नका, असं आईवडिलांनी सांगितल्यानंतर नवराबायकोमधील गृहकलह ताबडतोब थांबतात का? व्हॉटस्आप, फेसबुक, इन्स्टावर उगाचंच टाइमपास करू नकोस. अभ्यास कर, असं पालकांनी सांगितल्यानंतर विद्यार्थी ताबडतोब मोबाइल स्विचऑफ करून पुस्तकं घेऊन अभ्यासाला बसतात का? नाही ना? अर्जुनाच्या बाबतीतही हाच प्रकार घडला. श्रीकृष्णांच्या एका वाक्यासरशी जर अर्जुन बाह्या सरसावून युद्धाला उभा राहिला असता तर… तर पुढची भगवद्गीता सांगावीच लागली नसती. अर्जुन असा सहजासहजी सुधारण्यातला नव्हता.

मी आधी म्हटल्याप्रमाणे  आपण सगळे थोडय़ाफार फरकाने अर्जुनच आहोत. आपल्यातील दुर्गुण, आपल्या मनातील चुकीच्या संकल्पना, आपल्या वाईट सवयी, आपल्यातील आळस, आपली घातक व्यसनं अशी सहजासहजी जात नाहीत. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. अर्जुनासाठी जसा श्रीकृष्ण होता तशाच प्रकारच्या एखाद्या जाणकाराच्या मदतीने स्वतत सकारात्मक बदल करून घ्यावे लागतात. अनेकदा असा जाणकार सापडूनही योग्य ते बदल होत नाहीत. अशा वेळी स्वतच श्रीकृष्ण होऊन स्वततील अर्जुनाला सुधारावावं लागतं. त्यासाठी सर्वप्रथम आपण नेमके कुठे चुकतो आहोत याची जाणीव व्हावी लागते. तशी जाणीव करून देणारा स्वततील श्रीकृष्ण शोधावा लागतो. हा श्रीकृष्ण प्रत्येकात असतोच असतो. फक्त तो नीट शोधावा लागतो.

आपल्या स्वततील या श्रीकृष्णाचा शोध आपणच कसा घ्यायचा हेदेखील आपण पुढील लेखातून पाहणार आहोत.

[email protected]