गीताबोध – निर्द्वंद्व भव…

>> गुरुनाथ तेंडुलकर

मागील लेखात आपण पाहिलं की, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला `बुद्धी एकाग्र करून निर्णय घे,’ असं सांगताहेत. `जर तुझ्या बुद्धीला अनेक फाटे फुटले तर तुझे विचार भरकटतील आणि तू योग्य निर्णय घेऊ शकणार नाहीस,’ असंही सांगतात. त्या अनुषंगाने आपण इतर प्राणी आणि मनुष्य यांतील साम्यस्थळे आणि भेददेखील जाणून घेतले. जनावर आणि माणूस साम्यस्थळांमधे आहार, निद्रा, भय आणि मैथुन आहेत. परंतु इतर प्राणी आणि माणूस यांतील एकमेव भेद म्हणजे बुद्धीचा. माणसाला निसर्गाने बुद्धीची देणगी दिली आहे. त्या बुद्धीचा यथायोग्य वापर करूनच माणूस स्वतची आणि समाजाची कल्याणकारक प्रगती साधू शकतो. पण ही कल्याणकारक प्रगती साधण्यासाठी आवश्यकता असते ती स्वार्थविरहित होण्याची. म्हणूनच भगवान पुढे म्हणतात.

त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन।
निर्द्वंद्वो नित्यसत्वतस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ।। 45 ।।
यावानर्थ पदपाने सर्वत सम्प्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत ।। 46 ।।
अन्वय – हे अर्जुन, वेदाः त्रैगुण्य विषयाः वर्तन्ते। त्वम् निस्त्रैगुण्य भव।
निर्द्वंद्व, नित्यसत्त्वस्थ निर्योगक्षेम आत्मवान च भव।
सर्वत संप्लुतोदके यावान् उदपाने अर्थ तावान् विजानत ब्राह्मणस्य सर्वेषु वेदेषु।

भावार्थ – चारही वेद हे सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या विषयक गोष्टींनी भरलेले आहेत. या त्रिगुणातही आपापासात श्रेष्ठ कनिष्ट हा भेदभाव आहेच. तू या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन द्वंद्वापासून अलिप्त आणि शुद्ध सात्त्विक गुणांनी युक्त हो. कोणत्याही प्रकारच्या स्वार्थात न गढता आत्मनिष्ठ हो. कोणत्याही कर्मकांडात अडकून पडू नकोस. जेव्हा माणसाला स्वच्छ, निर्मळ पाण्याचं सरोवर सापडतं त्यावेळी डबक्याचं काहीच महत्त्व उरत नाही. तसंच तू त्रिगुणाच्या पलीकडे गेल्यानंतर वेदांतील कर्मकांडाला काहीच महत्त्व उरणार नाही.

हे दोन श्लोक जरा नीट समजून घ्यायला हवेत. सर्वसामान्य माणसं विविध देवांच्या प्रार्थना, पूजा-अर्चा करतात. विविध प्रकारच्या उपासना करतात. त्यामागे त्यांचा हेतू हा त्या दैवताच्या कृपेने आपल्याला सुखप्राप्ती व्हावी हाच असतो. ते देवाजवळ बहुतेक वेळा ऐहिक सुखाची मागणी करतात. कुणी पैसा मागतो तर कुणी परीक्षेत यश मागतो. तर कुणाच्या मुलीचं लग्न जुळत नाही म्हणून तर कुणाला मूल होत नाही त्यासाठी नवस बोलायला जातो. एकंदरीत विचार केला तर देवळाच्या बाहेर बसलेले भिकारी हे हातात कटोरा घेऊन भीक मागताना दिसतात, तर देवळात गेलेल्या भक्तगणांपैकी अनेकजण हे देवाजवळ हात जोडून भीक मागतात. एकंदरीत काय तर सगळ्या प्रार्थनेमागे, उपासनेमागे, कर्मकांडांच्या मागे काही ना काही तरी हेतू असतोच असतो.

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताहेत की, तू या सगळ्या मागण्यांपासून अलिप्त हो. इथे तुझा देव म्हणजे तुझा धर्म आहे… आणि तुझ्या धर्माच्या आज्ञेनुसार समोर उभ्या ठाकलेल्या शत्रूबरोबर युद्ध करणं हीच खरी त्या देवाची भक्ती आहे. हीच खरी उपासना आहे. हे युद्ध करताना तू कोणत्याही प्रकारच्या जय-पराजयाचा किंवा युद्धातून होणाऱया लाभ-हानीचा विचार करू नकोस. कोणताही हेतू मनात न बाळगता केवळ कर्तव्य म्हणून युद्ध कर. इथे पहिल्यांदाच सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचा उल्लेख आला आहे. व्यावहारिक जगात वावरताना या तीनही गुणांची आवश्यकता आहे. या तीन गुणांपैकी जो गुण ज्यावेळी वरचढ होतो त्यानुसार माणसाचं मन बदलत जातं आणि त्यानुसार त्याचं वर्तन घडत जातं. एकापेक्षा दुसरा गुण ज्या वेळी वरचढ होतो त्या वेळी त्या गुणानुसार माणसाच्या मनात द्वंद्व सुरू होतं. या द्वंद्वामधूनच माणसाला एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम किंवा द्वेष निर्माण होतो. प्रेम असेल तर तिथे आसक्ती निर्माण होते. द्वेष असेल तर तिथे तिरस्कार निर्माण होतो. शेवटी काय तर आसक्ती किंवा तिरस्कार दोन्हीही भावना या स्वार्थातूनच निर्माण होतात. त्यातून मोह निर्माण होतो आणि मोहग्रस्त माणूस समत्व बुद्धीने निर्णय घेऊ शकत नाही. म्हणूनच भगवान अर्जुनाला सांगताहेत की, तू सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर.

सुख-दुःख, चांगलं-वाईट, हानी-लाभ, न्याय-अन्याय… परस्पर विरोधी अनेक द्वंद्व माणसाच्या मनात पिंगा घालतात. अनेकदा तर हा पिंगा वावटळीचं रूप धारण करतो आणि काहीही सुचेनाशी अवस्था होते. कुरुक्षेत्रावर युद्धासाठी जमलेल्या आप्तेष्ट-नातेवाईकांना बघून अर्जुनाची अवस्था अशीच झाली नव्हती का? माणसाच्या बुद्धीवर संभ्रमाचा गंज चढला की ती काम करेनाशी होते. म्हणूनच भगवान सांगतात की, `हे अर्जुना, तू त्रिगुणाच्या पलीकडे डोकावून बघ. निर्द्वंद्व अवस्थेला जा. त्यामुळे तुझी बुद्धी शुद्ध होईल, स्थिर होईल आणि एकदा का बुद्धी शुद्ध झाली, स्थिर झाली की त्यानंतर तू जे निर्णय घेशील ते योग्यच असतील. त्याबद्दल तुला पुढे कधीही पश्चात्ताप करावा लागणार नाही.’

इथे भगवान अर्जुनाला उदाहरण देऊन समजावताहेत. ते म्हणताहेत की, जेव्हा पावसाळ्यात निर्मळ, नितळ पाण्याने सरोवर तुडुंब भरतं त्यावेळी डबक्यात साचलेल्या पाण्याचं महत्त्व काहीच उरत नाही. तसंच जेव्हा तू तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन तुला ब्रह्मज्ञानाची जाणीव होईल त्यावेळी कर्मकांड, उपासना आणि पूजापाठ यांना काहीच महत्त्व उरणार नाही. त्या वेळी तुझी उपासना म्हणजे केवळ तुझा धर्म असेल आणि तू क्षत्रिय असल्यामुळे तुझा धर्म हा युद्धच असेल… अशा वेळी त्या युद्धातून उद्भवणाऱया हत्यांचं तुला पाप लागणार नाही. तू फक्त कर्तव्य पार पाड. तू युद्ध कर.