गीताबोध – अतिरेकी

>> गुरुनाथ तेंडुलकर

मागील लेखामधे आपण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाने पहिल्या अध्यायात उपस्थित केलेल्या सगळ्या शंकांची समर्पक उत्तरे दिल्याचे जाणून घेतले. तसंच अर्जुनाला `पाप लागेल’ ही जी भीती वाटत होती, ते `पाप म्हणजे नेमकं काय असतं?’ यासंबंधीही थोडक्यात चर्चा केली. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्पष्टपणे सांगितलं की, `हे युद्ध तू केवळ कर्तव्य म्हणून लढ. जय-पराजयाचा किंवा सुख-दुःखाचा विचार न करता केवळ तुझ्या क्षात्रधर्माची मागणी आहे म्हणून लढ. असं केलंस तर तुला कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही.’

भगवान पुढे म्हणतात- 

एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धियोगे तु इमाम् श्रुणु ।

बुध्या युक्तो यया पार्थ कर्मबंन्धं प्रहास्यसि ।। 39 ।।

न इह अपामनाश न अस्ति प्रत्यवाय न विद्यते ।

स्वल्पम् अपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ।। 40 ।।

भावार्थ – हे अर्जुना, ही समबुद्धी ( सुखदुःखाचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून कर्म करणं) मी तझ्यासाठी पूर्वी सांख्ययोग शिकवतानाही सांगितली होती. (आत्मा अविनाशी आहे, त्यामुळे जन्माला आलेल्याबद्दल हर्ष करू नये किंवा मरण पावलेल्याबद्दल शोक करू नये. ) हीच समबुद्धी तू आता कर्मयोगाच्या विषयातदेखील उपयोगात आणू शकतोस. ही समबुद्धी कशी वापरायची हे नीट ऐक. या समबुद्धीच्या आधाराने तू कर्म केलंस तर ते प्रत्येक कर्म हे केवळ धार्मिक कर्म ठरतं आणि त्यामुळे तुला कोणत्याही प्रकारच्या पापाची भीती बाळगायचं कारणच उरत नाही.

इथे मुद्दाम नमूद करावंसं वाटतं की, सामान्य माणसाचं प्रत्येक कर्म कोणत्या ना कोणत्या फळाची अपेक्षा धरूनच केलं जातं. तरीही त्या कार्यातून होणाऱया परिणामांचे विचार न करता, कोणत्याही प्रकारची स्वार्थबुद्धी न बाळगता, केवळ कर्तव्य म्हणूनच ते कर्म पार पाडलं तर त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामातून पाप लागत नाही.

उदाहरणच द्यायचं झालं तर न्यायालयात एखाद्या आरोपीवरचा खुनाचा आरोप सिद्ध होतो आणि त्यास देहदंडाची शिक्षा सुनावली जाते. देहदंडाची शिक्षा सुनावणारे न्यायाधीश हे त्या आरोपीचे शत्रू नसतात. ते केवळ न्यायदानाचं आपलं सामाजिक कर्तव्य निभावत असतात. पुढे त्या गुन्हेगाराला फासावर लटकावलं जातं. फासावर लटकावणारा जल्लाद हादेखील त्याचं कर्तव्य म्हणूनच कर्म करीत असतो. त्यामुळे न्यायाधीश काय किंवा जल्लाद काय या दोघांचाही त्यात वैयक्तिक स्वार्थ नसतो. त्या गुन्हेगाराला फाशी दिल्यानंतर त्याच्या कुटुंबाचं काय होईल किंवा त्या गुन्हेगाराची अपुरी राहिलेली स्वप्नं कधीच पूर्ण होणार नाहीत यासारख्या गोष्टींचा न्यायसंस्थेनं विचारदेखील करायचा नसतो. त्यामुळेच त्या गुन्हेगाराच्या मृत्यूचं न्यायाधीशांना किंवा जल्लादाला पाप लागत नाही. त्या गुन्हेगाराचा मृत्यू हा त्यांनी केलेला खून नसतो, तर गुन्हेगाराने केलेल्या खुनाची शिक्षा अंमलात आणलेली असते.

हाच नियम सीमेवर लढणाऱया सैनिकांच्या बाबतीत लागू होतो. शत्रूसैन्यातील एखाद्या तरुणाला गोळी घालून ठार मारताना त्या तरुणाचा विवाह गेल्याच आठवडय़ात झाला होता किंवा त्याला दोन महिन्यांची लहान मुलगी आहे असा विचार करून चालण्यासारखं नसतं. एकदा का सैनिकी पेशा पत्करला, म्हणजे त्या पेशासोबत येणारी सर्व कर्तव्य-कर्मं बिनबोभाट पार पाडायची असतात.

अर्जुन हा स्वत एक क्षत्रिय आहे. त्यामुळे क्षत्रियाच्या धर्मास अनुसरून त्याने त्याचं कर्तव्य करताना पाप-पुण्याचा विचारदेखील करता कामा नये.

इथं आणखी थोडं विषयांतर करून सांगावंसं वाटतं की, आपल्या धर्मशास्त्रानुसार आततायी किंवा अतिरेक्यांना ठार मारल्यानं कोणत्याही प्रकारचं पाप नाही, असं स्पष्ट सांगितलं आहे. किंबहुना अतिरेक्यांना ठारच मारायला हवं, असंही ठासून सांगितलं आहे. आता प्रश्न येतो की, अतिरेकी नेमकं कुणाला म्हणावं? आततायी किंवा अतिरेकी या शब्दाची नेमकी व्याख्या कोणती?

वसिष्ठस्मृतीच्या आधाराने अतिरेकी सहा प्रकारचे असतात.

अग्निदो गरदश्च एव शस्त्रपाणिर्धनापह ।

क्षेत्र दारा अपहर्ता च षडेते ही आततायिन ।। ( वसिष्टस्मृती )

भावार्थ – 1) घरांना, शेताला किंवा इतर कोणत्याही सामाजिक संपत्तीला आग लावणारा, 2) वीष देणारा, 3) हातात शस्त्र घेऊन हत्या करण्यासाठी आतुर झालेला, 4) धनाचे जबरदस्तीने किंवा फसवून अपहरण करणारा, 5) दुसऱयाच्या मालकीची जमीन बळकावणारा  6 ) दारा म्हणजेच पत्नीचे अपहरण करणारा, पत्नीच्या इभ्रतीवर हल्ला करणारा.

हे सहा प्रकारचे लोक आततायी म्हणजेच अतिरेकी आहेत असं मानलं जातं.

महाभारतातील कथा जाणून घेतल्यास कौरवांनी हे सर्वच्या सर्व गुन्हे केलेले आहेत.

1 ) लाक्षागृहात पांडवांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

2 ) भीमाला अन्नातून वीष खाऊ घातलं.

3) पाचही पांडवांना ठार मारायला कौरव तर टपूनच बसले होते. आताही ते युद्धात शस्त्रसज्ज होऊन पांडवांची हत्या करण्यासाठी उत्सुकच आहेत.

4) पांडवांना द्युताच्या माध्यमातून फसवून त्यांची सगळी संपत्ती कौरवांनी हिरावून घेतली होती.

5) पांडवांच्या वाटय़ाला आलेलं त्यांचं राज्यदेखील कौरवांनी कपटानं बळकावलं.

6) द्रौपदीची तर भर सभेत विटंबना केली.

वसिष्ठस्मृतीनुसार सांगितलेली अतिरेक्यांची सहा म्हणजेच सर्वच्या सर्व लक्षणं कौरवांना लागू होतात. त्यामुळे अशा अतिरेक्यांना ठारच मारायला हवं, असं धर्मशास्त्र सांगतं.

न आततायि वघे दोषो हन्तुः भवति कश्चन ।

म्हणजेच आतयायींना किंवा अतिरेक्यांना ठार मारल्यानंतर कोणत्याही प्रकारचा दोष किंवा पाप लागत नाही.

काही वर्षांपूर्वी कश्मीरच्या खोऱयात हिंदूंवर भीषण हल्ले होत होते. आपल्या लष्कराच्या जवानांवरदेखील दगडांचा वर्षाव होत होता. पण दुर्दैवाने तत्कालीन शासनाकडून प्रत्युत्तर देण्याचे आदेश नव्हते. त्यामुळे अतिरेकी बोकाळत चालले होते. त्या अतिरेकी कृत्यांची झळ अगदी सामान्य नागरिकांनादेखील बसत होती. पण आता मात्र गोळीला उत्तर गोळीनंच… एवढंच नव्हे तर दगडाचं उत्तरदेखील गोळीनंच द्यायचं, या धोरणामुळे कश्मीरच्या खोऱयात शांतता प्रस्तापित होत आहे. ज्या श्रीनगरमधील लालचौकात तिरंगा ध्वज कधीही फडकावला गेला नव्हता, त्या ठिकाणी आता स्वातंत्र्य दिनादिवशी आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तिरंगा सन्मानानं फडकावला जातो. याचं कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेत सांगितलेला उपदेश हे सरकार अंमलात आणायला लागलं आहे.

कोणत्याही प्रकारची दयामाया न दाखवता अतिरेक्यांचा संपूर्ण खातमाच केला पाहिजे ही प्रत्यक्ष भगवद्गीतेचीच शिकवण आहे.

[email protected]