>> गुरुनाथ तेंडुलकर
मागील अध्यायात आपण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला क्षत्रियांचा धर्म आणि त्या धर्माची कर्तव्य यांच्याबद्दल काय सांगतात ते पाहिलं. अर्जुन क्षात्रधर्मापासून परावृत्त झाला तर त्याचे परिणाम काय होतील हेदेखील सांगितलं.
भगवान पुढे म्हणतात –
भयात् रणात् उपरतम मन्यसे त्वां महारथाः।
येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम।। 35।।
अवाच्यवादान् च बहुन् वदिष्यंन्ति तव आहिताः।
निन्दन्त तव सामर्थ्यम् तत दुःखतरम् नु किम्।। 36।।
भावार्थ – तू जर युद्ध टाळलेस तर सगळे रथी, महारथी लोक तुझ्याबद्दल भीतीमुळे युद्धातून उपरती झालेला भित्रा माणूस असे मानतील आणि आज जे तुझा सन्मान करताहेत त्यांच्या नजरेतून तू उतरशील.
तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील. उच्चारू नये अशी दूषणे तुला लावतील. तुझ्याबद्दल नको नको ते बोलतील. अशा प्रकारची बेअब्रू होण्याहून अधिक क्लेशकारक काय असू शकेल?
भगवान पुढे म्हणतात –
हतो वा प्राप्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्षसे महीम्।
तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय।। 37।।
भावार्थ – जर तू या युद्धात मारला गेलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल आणि जर युद्धात तू जिंकलास तर तुला या भूमीचे राज्य भोगायला मिळेल.
भगवान पुढे म्हणतात –
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम् अवाप्यसि।। 38।।
भावार्थ – सुख किंवा दुःख, लाभ किंवा हानी, जय किंवा पराजय यात भेद न बाळगता जर तू केवळ कर्तव्यभावनेने युद्ध केलेस तर त्या युद्धातून होणाऱया कोणत्याही हत्यांचे पाप तुला लागणार नाही. म्हणून तू स्थिर चित्ताने युद्धाला प्रवृत्त हो.
या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ः
सुखी संतोषा न यावे। दुःखी विषादा न भजावे।
आणि लाभालाभ न धरावे। नामाजीं।।
भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुन अस्वस्थ झाला होता. त्याने युद्ध टाळण्यासाठी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अनेक वेगवेगळ्या प्रकारचा युक्तिवाद करून युद्ध कसे वाईट आहे हे भगवान श्रीकृष्णांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भगवंतांनी दुसऱया अध्यायातील श्लोक क्रमांक 31 ते 38 या आठ श्लोकांमध्ये दिली आहेत. किंबहुना अर्जुनाचे सगळे मुद्दे खोडून काढले आहेत.
अर्जुनाने ठामपणे सांगितले होते, ‘युद्ध केल्याने माझे काहीही कल्याण होणार नाही.’
भगवान म्हणतात, ‘क्षत्रियांसाठी युद्धापेक्षा मोठे असे कल्याणाचे कोणतेही साधनच नाही.’
अर्जुनाने विचारले होते, ‘युद्धाने आम्ही सुखी कसे होऊ?’
भगवान उत्तर देतात, ‘ज्या क्षत्रियांना युद्ध करण्याची संधी मिळते तेच क्षत्रिय सुखी आहेत.’
अर्जुन म्हणाला होता, ‘युद्धात आपल्या माणसांना मारून मी नरकात जाईन.’
भगवान म्हणतात, ‘युद्ध करताना जर तू मारला गेलास तर तू स्वर्गात जाशील.’
अर्जुनाने युक्तिवाद केला होता, ‘युद्धात पुरुष मारले जातील. स्त्रिया विधवा होतील, कुलक्षय होईल आणि धर्माचा नाश होईल.’
भगवान म्हणतात, ‘हे धर्मयुद्ध आहे. हे टाळलेस तर धर्माची हानी होईल.’
अर्जुन म्हणाला होता, ‘मला पाप लागेल याची मला भीती वाटते.’
भगवान म्हणतात, ‘तू लाभ-हानी, जय-पराजय यांचा विचार न करता केवळ एक कर्तव्य म्हणून युद्ध केलेस तर तुला कोणतेही पाप लागणार नाही.’
इथे पुनः पुन्हा पाप हा शब्द आला आहे.
हे पाप म्हणजे नेमके काय आणि पुण्य म्हणजे तरी नेमके काय?
या पाप-पुण्याचा बराच मोठा ऊहापोह अनेक धर्मग्रंथांतून, वेद- वाङ्मयातून, उपनिषदांतून प्रामुख्याने अठरा पुराणांतून केला आहे. परंतु पाप आणि पुण्य या दोन्ही शब्दांची नेमकी व्याख्या श्री वेदव्यास मुनींनी केली आहे. ते म्हणतात,
अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्
परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनाम्
भावार्थ – अठरा पुराणांतून (अनेक धर्मग्रंथांतून) व्यासांनी दोन वाक्ये निवडून काढली आहेत. पुण्य म्हणजे परोपकार आणि पाप म्हणजे परपीडा.
तुकाराम महाराजांच्या अभंग जो राम फाटकांनी संगीतबद्ध करून त्याला पं.भीमसेन जोशींनी गाऊन तो मूळचाच अभंग अ-भंग केला तो आपल्याला आठवत असेलच.
पुण्य पर उपकार पाप ते परपीडा। आणिक नाही जोडा दुजा यासी।।
सत्य तो चि धर्म असत्य ते कर्म। आणिक हे वर्म नाही दुजे।।
गति तेचि मुखी नामाचे स्मरण। अधोगती जाण विन्मुखता।।
संतांचा संग तोचि स्वर्गवास। नर्क तो उदास अनर्गळा।।
तुका म्हणे उघडे आहे हित-घात। जया जे उचित करा तैसे।।
या एका अभंगावर मी शे-शंभर पानांचे पुस्तक लिहू शकेन एवढा गूढ आणि गहन अर्थ यात भरलेला आहे. असो.
अर्जुनाने पहिल्या अध्यायात उपस्थित केलेल्या सगळ्या प्रश्नांची भगवान श्रीकृष्ण यथायोग्य उत्तरे इथे देतात….
तरीही अर्जुनाचे प्रश्न संपतच नाहीत….
खरे सांगायचे तर भगवद्गीता प्रथम वाचताना माझ्याही मनातल्या अर्जुनाचे प्रश्न संपले नव्हते. एका प्रश्नातून पुढे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. एखाद्याची हत्या करायची आणि त्याचे पाप लागत नाही हे कसे काय? हा प्रश्न आपल्याही मनात आल्याशिवाय राहणार नाही, पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढे पुढे सापडतात.
अर्जुन आणि भगवंतामध्ये पुढे काय संवाद होतो आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पायरी पायरीने कसे शहाणा करतात ते आपण पुढे पाहू या.
।। श्री कृष्णार्पणमस्तु ।।