
>> गुरुनाथ तेंडुलकर
भगवद्गीता हा ग्रंथ भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादावर आधारलेला आहे. ऐन युद्धाच्या क्षणी आपलं क्षात्रतेज हरवलेल्या अर्जुनाला पुन्हा मूळ मार्गावर आणण्यासाठी भगवंतांनी जो बोध केला त्या बोधाचं शब्दरूप म्हणजे भगवद्गीता. त्या वेळी अर्जुनाला उपदेश करण्याच्या हेतूनं भगवंतांनी जे तत्त्वज्ञान सांगितलं ते तत्त्वज्ञान आजही आपल्यासारख्या अनेक सर्वसामान्य माणसांना मार्गदर्शक ठरत आहे.
मागील लेखातील श्लोकातून आपण भगवंतांनी अर्जुनाला एकाग्र होऊन तुझे कर्म कर… स्थिर बुद्धीने विचार कर. भलतेसलते विचार मनात न आणता केवळ युद्धावर लक्ष केंद्रित करण्यासंबंधी सांगितलं होतं. आजच्या लेखात आपण स्थिर बुद्धीच्या मार्गात येणाऱ्या काही अडथळ्यांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
भगवान म्हणतात…
याम् इमाम पुष्पितामा् वाचम् प्रवद्न्ति अविपश्चित ।
वेदवादरताः पार्थ, न अन्यत अस्ति इति वादिन ।। 42 ।।
कामात्मान स्वर्गपराः जन्मकर्म फलप्रदाम् ।
क्रियाविशेष बहुलाम् भोगैश्वर्य गतिम् प्रति ।। 43 ।।
भोगैश्वर्य प्रसक्तानाम् तया अपहृत चेतसाम् ।
व्यवसात्मिका बुद्धि समाधौ न विधीयते ।। 44 ।।
भावार्थ – अविवेकी लोक केवळ दिखाऊ किंवा वरकरणी सुंदर वाटणाऱ्या शब्दांनी बोलतात. वेदांच्या केवळ बाह्य अर्थवादात रममाण झालेली माणसं सकाम कर्माच्या व्यतिरिक्त इतर कसलाही विचार करत नाहीत. केवळ इहलोकीचे भोग आणि त्यानंतर परलोकीचे स्वर्गसुखादी ऐश्वर्य यांच्या मागे प्राप्तीसंबंधी जी कर्मे आहेत, त्याच कर्मांत गुरफटून जातात. अशांचे चित्त केवळ सुखाच्या मागे धावल्यामुळे त्यांना बुद्धी एकाच ठिकाणी स्थिर करता येत नाही. ते एकाग्रतापूर्वक कर्मातून जाणवणाऱ्या समाधी स्थितीचा अनुभव कधीच घेऊ शकत नाहीत. (समधौ न विधीयते)
आपण सर्वसामान्य माणसं जे काही काम करतो त्यामागची प्रेरणा काही भलतीच असते. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपण जिथे नोकरी करतो किंवा व्यवसाय करतो, त्यामागची आपली प्रेरणा त्या नोकरी-व्यवसायातून पैसा कमावणं ही असते. नोकरीतून महिनाअखेरीला मिळणारा पगार मिळाला नसता तर आपल्यापैकी किती जणांनी ती नोकरी केवळ स्वतला आवडते म्हणून केली असती? बहुतेक वेळा आपण करत असलेल्या प्रत्येक कर्मामागची प्रेरणा काही वेगळीच असते. लोक देवाची पूजा करतात त्यामागेदेखील काहीतरी इच्छा मनात धरलेली असते.
बहुतेक वेळा या इच्छा केवळ शरीराकडून मिळणाऱ्या सुखोपभोगांच्या बाबतीतच असतात. ‘भोग’ या शब्दामागे फार मोठा अर्थ दडलेला आहे. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या पाच ज्ञानेंद्रियांकडून आपल्याला अनुकूल आणि हवंहवंसं वाटणारं सुख म्हणजे भोग.
पाच ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला नेमकं काय मिळतं तर डोळ्यांनी दिसतं. आपल्याला अनुकूल असंच दिसावं, आपल्याला आवडेल तेच आपल्या डोळय़ांसमोर यावं, कानांनी आपल्याला सुखावेल अशाच प्रकारचे ध्वनी-शब्द ऐकू यावेत, नाकाने आपल्याला नित्य सुगंधच अनुभवता यावा, जिभेने आपल्याला आवडणाऱ्या पदार्थांची रुचकर चव चाखता यावी आणि त्वचेने देहाला सुखावणारा स्पर्श नियमित लाभावा यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. हे भोग भोगण्यासाठी काही विशिष्ट साधनसंपत्तीची आवश्यकता असते. त्यालाच आपण ‘ऐश्वर्य’ असं म्हणतो. त्यात पैसा, घर, उत्तम वस्त्रं, करमणुकीची साधनं, दळणवळणासाठी वाहनं अशा अनेक प्रकारच्या साधनसंपत्तीची आवश्यकता असते. या साधनांच्या उपभोगाची आसक्ती निर्माण होते. आपण अधिकाधिक गुरफटत जातो. अशा प्रकारचे देहाचे उपभोग घेण्यात आणि त्यासाठी आवश्यक ती साधनसंपत्ती गोळा करण्यातच आपला जन्म संपून जातो. अशा प्रकारच्या सर्वसामान्य माणसांसाठी भगवंतांनी वरील श्लोकात एक चांगला शब्द वापरला आहे. ते म्हणतात, भोगेश्वर्य प्रसक्तानाम्! भोग आणि ऐश्वर्य यांच्या आसक्तीत बुडालेले लोक. देहाचे उपभोग घेण्यात गैर काहीच नाही. तसंच त्यासाठी आवश्यक ती साधनसंपत्ती मिळवण्यासाठी योग्य प्रकारचे प्रयत्न करणंदेखील गैर नाही, परंतु… आपण माणसाच्या जन्माला आलो आहोत. आपण पशू नाही. माणसाखेरीज इतर सगळ्या प्राणिमात्रांचं आयुष्य केवळ आणि केवळ उपभोगातच संपून जातं. आपल्या बाबतीत तसं होता कामा नये.
एक श्लोक सहजच आठवला. तो सांगण्याचा मोह आवरता येत नाही.
आहार निद्रा भय मैथुनं च सामान्यम् एतद् पशुभि नराणाम् ।
बुद्धेर्हि तेषां अधिको विशेषो बुद्धिर्विहिना पशुभि समानाः ।।
सुभाषितकार म्हणतात की, माणूस आणि पशू यांच्यातील सामान्य गुण, ज्याला इंग्रजीत ‘कॉमन फॅक्टर’ म्हणतात, ते कोणते तर आहार, निद्रा, भय आणि मैथुन. पशू काय करतात? भूक लागली की, खातात. माणूसही हेच करतो की! किंबहुना माणूस तर भूक लागलेली नसतानादेखील केवळ मिळतंय म्हणून खातो. इच्छा झाली म्हणून खातो. चव आवडली म्हणून ‘आपल्याला हे पचेल का?’ याचा विचार न करता केवळ रुचेल ते खातो.
दुसरा सामान्य गुण म्हणजे निद्रा. कोणताही झोपलेला माणूस बघा आणि झोपलेला पशू बघा. दोघांनाही झोपेमधे काहीही शुद्ध नसते. पशूची तर झोप सावध तरी असते, पण माणूस झोपेत पार अस्ताव्यस्त होऊन झोपतो. काही माणसांच्या बाबतीत तर खाणं आणि झोपणं हे आयुष्यातील छंदच होऊन बसतात. आपण ज्या वेळी करमणुकीचे कार्यक्रम पाहतो त्या वेळीही आपण वेगळ्या प्रकारे झोपलेलोच असतो. बुद्धी गहाण पडल्यासारखे आपण टीव्हीवरचे कार्यक्रम पाहतो. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि इंटरनेट आल्यामुळे फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉटस्आपसारख्या माध्यमातून आपण जे काही करतो तो एक प्रकारच्या निद्रेचाच प्रकार असतो. पशू झोपतात. झोपेमुळे शरीराला विश्रांती मिळते. काही अगदी करमणुकीसाठी विश्रांतीचा वेळदेखील वाया घालवतात. नेटफ्लिक्सच्या एका अधिकाऱ्याला एका मुलाखतीत विचारलं होतं की, तुमचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी कोण वाटतो? प्रश्न विचारणाऱ्याला अपेक्षा होती की, ते अधिकारी बहुतेक अमेझॉन प्राईम किंवा झी फाईव्ह किंवा इतर कोणत्या तरी ओटीटी प्लॅटफॉर्मचं नाव घेतील, पण त्या अधिकाऱ्याने उत्तर दिलं होतं, आमचा पहिल्या क्रमांकाचा आणि एकमेव प्रतिस्पर्धी नव्हे, तर शत्रू म्हणजे झोप. लोक जर झोपेच्या वेळेला झोपू लागले तर आमचे कार्यक्रम कोण बघणार? त्यांनी रात्र-रात्र जागरणं करून आमचे कार्यक्रम पाहायला हवेत. झोपता कामा नये.
माणूस आणि पशू यांच्यातील तिसरा सामान्य घटक म्हणजे भीती. पशूला भीती वाटली की, तो एकतर प्रतिकार करतो, पळून जातो किंवा लपून बसतो. यालाच इंग्रजीत ‘फाईट, फ्लाईट आणि फ्रीज’ असं म्हणतात. माणूसही थोडय़ाफार फरकाने तेच करतो.
चौथा घटक म्हणजे मैथुन. प्रामुख्याने पुनरुत्पादनाच्या हेतूने निसर्गाकडून मिळालेल्या वासनेचा वापर करून नर पशू मादीबरोबर मैथुन करतात आणि आपला वंश वा माणूसही हेच करतो. किंबहुना पशू जे करत नाही ते प्रकार माणूस करतो. पशू कधीही बलात्कार करत नाही. मादीच्या इच्छेविरुद्ध तिच्या देहाचा भोग घेत नाही. इथे माणसाच्या बाबतीत तर काही वेगळेच प्रकार बघायला मिळतात. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर बाई म्हणजे केवळ उपभोगाचीच वस्तू असल्याच्या थाटात वावरणारे अनेक पुरुष आपण पाहतो. असो. त्याबद्दल पुन्हा सविस्तर बोलू.
तर हे चार घटक जे पशू आणि माणूस यांच्यात सारखेच आहेत ते… आहार, निद्रा, भय आणि मैथुन. पण सुभाषितकार म्हणतात,
बुद्धेर्हि तेषां अधिको विशेषो बुद्धिर्विहिना पशुभि समानाः ।
बुद्धी हा घटक जो पशूकडे नसतो, तो माणसाला विशेषत्वे प्राप्त झालेला आहे. म्हणूनच ज्याला बुद्धी नाही असा माणूस हा पशूसारखाच असतो.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगताहेत.
केवळ देहाच्या आणि सुखोपभोगांच्या आसक्तीत अडकून न राहता बुद्धीने विचार कर आणि त्यानुसार कर्म कर.
tendulkar.hdfc@gmail.com