कश्मीरच्या बांदीपोरा येथे चकमक; एक दहशतवादी ठार

श्रीनगरमध्ये भरबाजारात रविवारी ग्रेनेड हल्ला केल्याच्या घटनेनंतर आज  कश्मीरमधील बांदीपोरा येथील केतसून वन परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलांना बांदीपोराच्या चोंटपथरी जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर परिसराची नाकाबंदी करून शोधमोहीम राबवण्यात आली. दरम्यान, चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.

शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर चकमक उडाली. सुरक्षा दलांनीही दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. यात एक दहशतवादी मारला गेला. मात्र याच परिसरात आणखी एक दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून चकमक अजूनही सुरूच आहे. दरम्यान, याआधी 2 नोव्हेंबरलाही श्रीनगरच्या खानयारमध्ये चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता. चकमकीत चार जवान जखमी झाले. दरम्यान, बांदीपोरा पोलीस आणि 26 आसाम रायफल्सचे संयुक्त पथक आज दहशतवाद्यांच्या शोधमोहिमेत सहभागी झाले. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.

दहशतवाद्यांना आसरा देणाऱयांची घरे जमीनदोस्त करणार – राज्यपाल

दहशतवाद्यांना जे आसरा देतील, मदत करतील त्यांची घरे जमीनदोस्त केली जातील, असा इशारा जम्मू-कश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज दिला तसेच दहशतवादाविरोधात एकजुटीने उभे राहण्याचे आवाहनही केले. सुरक्षा दले, पेंद्र शासन आणि लोकांनी एकत्र येऊन वर्षभरात येथील दहशतवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. जम्मू-कश्मीरमधील निरपराध नागरिकांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ देऊ नका; मात्र जे दोषी असतील त्यांना सोडू नका, असे आदेश सुरक्षा दलांना दिल्याचेही राज्यपाल म्हणाले. काही लोक म्हणाले, दहशतवाद्यांना आसरा देणाऱयांवर अत्याचार करण्यात आले. परंतु ते अत्याचार नसून तो न्याय आहे याकडेही राज्यपालांनी लक्ष वेधले.