संपूर्ण जग इंग्रजी नववर्षाचे स्वागत करत असताना जळगाव जिल्ह्यातील पाळधीमध्ये मोठा राडा झाला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजवला आणि कट मारल्याच्या कारणातून दोन गट एकमेकांशी भिडले. संतप्त जमावाने गावात दगडफेक करत दहा ते बारा दुकानांना आग लावली. वाहनांचीही जाळपोळ करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाव घेतली आणि मोठा फौजफाटा तैनात केला. सध्या पाळधी गावामध्ये गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून दगडफेक, जाळपोळ करणाऱ्यांचा शोध सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी सांगितले.
31 डिसेंबरच्या रात्री काय घडलं?
माध्यमात आलेल्या वृत्तानुसार, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबीयांना घेऊन ड्रायव्हर जात होता. याचवेळी पाळधी गावाजवळ मोठ्याने हॉर्न वाजवत गाडीला कट मारण्याच्या वादातून वादाला सुरुवात झाली. वाद वाढत गेल्याने गावातील तरुण आणि मिंधे गटाचे कार्यकर्तेही तिथे पोहोचले. शाब्दिक वाद पुढे हाणामारीपर्यंत पोहोचला आणि यातूनच दगडफेक, जाळपोळ झाली. जमावाने तब्बल दहा ते बारा दुकाने आणि गाड्यांना आग लावली. यामुळे मोठा गोंधळ उडाला.
गावात तणावपूर्ण शांतता
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाव घेतली. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी दुकानं, गाड्यांना लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी गावात गस्तही घातली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत 20-25 जणांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.
गुरुवारपर्यंत संचारबंदी
पाळधी व लगतच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व जनजीवन सुरळीत रहावे याकरिता भादवि 2023 चे कलम 163 चे आदेश लागू करण्यात आला आहे. एरंडोल उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन पाळधी या संपूर्ण गावाचे हद्दीत बुधवारी पहाटे 3.30 वाजेपासून ते दि. 2 जानेवारी सकाळी 6.00 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती, संस्था, संघटना यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्यात नमूद केल्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश अत्यावश्यक सेवा रुग्णसेवा, पाणीपुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, अंत्यविधी व शासकीय कर्मचारी यांना लागू राहणार नाही, असे निवृत्ती गायकवाड यांनी दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.