गुकेशची विजयासह आघाडी; गतविजेत्या लिरेनचा 11 व्या फेरीत पराभव

हिंदुस्थानी ग्रॅण्डमास्टर डोम्माराजू गुकेशने अखेर रविवारी जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील बरोबरीची मालिका खंडित केली. त्याने गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनचा 11 व्या फेरीत पराभव करीत 6-5 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. स्पर्धेतील केवळ तीन लढती शिल्लक असल्याने 18 वर्षीय गुकेशचा आता खरा कस लागणार आहे. डिंग लिरेनने विजयी सलामी देत स्पर्धेत झकास सुरुवात केली होती. दुसरी लढत बरोबरीत सुटल्यानंतर गुकेशने तिसरी लढत जिंकून स्पर्धेत बरोबरी साधली. त्यानंतर उभय संघांमध्ये सलग सात लढती बरोबरीत सुटल्याने स्पर्धेत रंगत निर्माण झाली होती, मात्र अखेर हिंदुस्थानच्या गुकेशने आघाडी घेण्यात यश मिळविल्याने हिंदुस्थानी चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 18 वर्षीय गुकेश आता विजेतेपदापासून केवळ 1.5 गुणांनी दूर आहे.