गुजराती लॉबी मुख्यमंत्री ठरवणार, नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये शपथविधी घ्यावा; संजय राऊत यांची जोरदार टीका

बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पैश्यांनी विकत घेता येत नाही, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच राज्यात मुख्यमंत्री कोण होणार हे गुजराती लॉबी ठरवणार आणि महायुतीने गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये शपथविधी ठेवावा असा टोलाही लगावला

आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जसं हरयाणात झालं. पहिल्या दोन तासांत जी लढाई बरोबरीने सुरू होती, ती अचानकपणे पुढल्या दोन तासांत निकाल लागले, ते संशयास्पद आहे. लोकशाहीमध्ये असं होत नाही. निकाल आधीच ठरलेला होता, मतदान नंतर होऊ दिलं. तरीही महाराष्ट्रातल्या घडामोडीला कोणी जबाबदार असेल तर ते सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड. देशाचं सुप्रीम कोर्ट ज्यांनी आमदार अपात्रतेसंदर्भात वेळेत निर्णय द्यायला हवा होता. मग तुम्ही कशा करता बसलेलात? अडीच तीन वर्ष निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशाकरता उबवताय? सरकारवर का ओझं म्हणून जनतेच्या पैशाचा चुराडा करताय. धनंजय चंद्रचूड हे चांगले प्राध्यापक आहेत भाषणं देण्यासाठी चांगले आहेत. पण घटनात्मक पेचावर ते निर्णय देऊ शकले नाहीत, यासाठी इतिहास त्यांना कधीच माफ करणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्रातलं चित्र बदललं असतं. त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षातरांसाठी खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवून गेले आहेत. आतासुद्धा कोणीही कशाही उड्या मारेल, विकत घेऊ शकेल. कारण कायद्याची, 10 व्या शेड्युलची भितीच राहिलेली नाही आणि न्यायमुर्तींनी ही भिती घालवली आहे. या सगळ्या घटनेला जस्टिस चंद्रचूड जबाबदार आहेत, इतिहासात त्यांचे नाव काळ्याकुट्ट अक्षरांत लिहिले जाईल.

मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरात लॉबी ठरवणार. महाराष्ट्रात शपथ घेण्याऐवजी त्यांनी गुजरातेत शपथ सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल. गुजरातला नरेंद्र मोदी स्टेडियम आहे तिथे हा शपथविधी घेतला तर अधिक संयुक्तिक ठरेल. शिवतीर्थावर हा शपथविधी झाला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरेल. वानखेडेवर घेतला तर तो 106 हुतात्म्यांचा अपमान ठरेल. हे सरकार गुजरात लॉबीला हवं होतं म्हणून आणण्यात आणि लादण्यात आलं आहे.

जनतेच्या न्यायालयातला न्यायही विकत घेण्यात आला आहे. आम्ही निराश नाही, आम्हाला वाईट जरूर वाटलं. महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय आणि महाराष्ट्राची आम्हाला चिंता आहे. आम्ही ही लढाई अर्धवट सोडणार नाही. मतविभागणी हा सर्वात मोठा फॅक्टर ठरला आहे. त्यात मनसे, वंचित या सगळ्यांना व्यवस्थित मॅनेज करून ठिकठिकाणी आमचे उमेदवार कसे पाडण्यात आले हे चित्र मुंबईत तुम्ही बघू शकता. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी असा काय तीर मारला की त्यांना एवढ्या जागा मिळाव्यात? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन विषारी प्रचार केला. आणि लोकांची मनं आणि मतं भडकावली. त्याचा परिणाम झाल्याचा दिसतोय. याचे विश्लेषण आमच्याकडून अजून सुरू आहे. शरद पवारांसारखा नेता यांनी गद्दारांविरोधात भूमिका घेतली. त्यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळत होता, जेणेकरून शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे तिथे जर शरद पवारांचा उमेदवार पडले असते तर ही गोष्ट गंभीर असल्याचे आम्हालाही वाटलं असतं. शिवसेनेच्या अनेक बालेकिल्ल्यात आम्हाला हार पत्करावी लागली ही बाब सुद्धा गंभीर आहे. एकनाथ शिंदे हे फार मोठा विचार घेऊन राजकारणात आलेले नाहीत. ते शिवसेनेशी बेईमानी करून भारतीय जनता पक्ष मोदी शहांच्या मदतीने आपले राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण भाजप हा वापरा आणि फेका या वृत्तीचा असल्याने जे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत जे घडलं लवकरच एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत घडेल याबाबत मला नेहमीच शंका आहे.

कालचा निकाल ही मी निकाल मानत नाही, हा जनतेचा कौल आहे असे मी मानत नाही, कौल म्हणून जो आमच्यासमोर आणला आहे. तर त्या संदर्भात प्रत्येक राजकीय पक्षाला ज्यांचे खरंच महाराष्ट्रावर प्रेम आहे, आणि ज्यांना मराठी माणसाबद्दल आस्था आहे त्या प्रत्येकाने गांभीर्याने विचार करून 106 हुतात्म्यांनी प्राण दिले. बाळासाहेब ठाकरे यांनी पाठीचा कणा दिला आहे, त्या कण्यावर लाथ मारून तो कणा तोडण्याचा प्रयत्न होत आहे त्या साठी सगळ्यांना एकत्र बसून विचार करावा लागेल हे माझं मत आहे.

महाराष्ट्रात शिवसेना राहू नये आणि शरद पवारांची राष्ट्रवादी राहू नये या मार्गाने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची पावलं पडत आहेत. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड न करणारे पक्ष आहेत. वैचारिक भूमिका असतात. पण हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राचे ताठ कणे आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी हे लढणारे पक्ष आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांना संपवायचं, यांना राजकारणा. ठेवायचंच नाही, या साठी केलेली कारस्थानं उघड झाली आहेत, आम्ही गौतम अदानीच्या पैशाच्या राजकारणाला विरोध केला, पण गौतम अदानही हा भाजपचा चेहरा आहे. त्यामुळे अदानीचा वापर करून आम्हाला हरवण्याचा प्रयत्न केला. गौतम अदानीविरोधात अमेरिकेत वॉरंट निघतात. ते दाखवतात की महाराष्ट्रात अदानीला पाठिंबा आहे. म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी कुठल्याही पक्षाचा असेल त्यांनी एकत्र यावे. काल जे विजयाच्या नावाने बांडगुळ जन्माला आलेलं आहे, त्याला खतपाणी न घालणं हे प्रत्येक मराठी माणसांच आणि मराठी नेत्याचं काम आहे.

निवडणुका संपल्या आहेत. आणि महाराष्ट्राचा विचार आपण केला पाहिजे. या निकालामुळे महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं आहे. सत्ता येणं, मुख्यमंत्री होणं आणि दिल्लीत मोदींनी जयजयकार करणं, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वियज व्हायला पाहिजे, महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचा विजय झाला पाहिजे. महाराष्ट्रात शरद पवारांचा विजय व्हायला पाहिजे. मोदी आणि शहांचा महाराष्ट्राशी काय संबंध, यांनी महाराष्ट्र लुटून गुजरातला नेला आणि मोदींचा विजय, उद्या शपथ घेणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.

एकनाथ शिंदे म्हणाले की बााळासाहेबांचा विचार आमच्याकडे आहे. हे म्हणजे रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडर यांचा वारसा आमच्याकडे आहे असे सांगण्यासारखे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पैश्यांनी विकत घेता येत नाही. किंवा गुजरातच्या चरणावर बूट चाटून बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जिवंत ठेवता येत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनाही पराभवाचे धक्के बसले होते. त्याची पर्वा न करता बाळासाहेब ठाकरे लढत होते, हा इतिहास एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी समजून घ्यावा. आम्ही अजूनही जमिनीवर आहोत आणि अजूनही लढायला तयार आहोत.