आता महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळविण्याचा डाव, जयंत पाटील यांचा आरोप

महाराष्ट्रात येणारे अनेक मोठे उद्योग गुजरातला पळवून लाखो युवकांचा रोजगार हिरावला. आता या भागातील पाणी गुजरातला पळविण्याचा डाव आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

नाशिकच्या मखमलाबाद येथे पूर्व मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश गीते, सिन्नर येथे उदय सांगळे यांच्या प्रचारार्थ शनिवारी जाहीर सभा झाली. त्याप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी वाढली आहे. महिला असुरक्षित आहेत. महागाई, बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे. महायुतीतले सत्ताधारी हे लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ आहेत. महाविकास आघाडीच बहिणींचे सख्खे भाऊ असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी गणेश गीते, उदय सांगळे, श्रीराम शेटे, खासदार भास्कर भगरे आदींची भाषणे झाली. या सभांना पंडितराव पिंगळे, कोंडाजी आव्हाड, नाना महाले, गोकुळ पिंगळे, गजानन शेलार, दत्तु पाटील, नितीन कदम, अजय बागुल, महेश बडवे, प्रशांत दिवे, आकाश छाजेड, तिलोत्तमा पाटील, संगीता पाटील, सचिन पिंगळे, जगदीश गोडसे, रामकृष्ण झाडे, लक्ष्मणराव मंडाले, पुरुषोत्तम कडलग, राजेंद्र मोगल आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.