विवाहबाह्य संबंधाच्या आरोपावरून महिलेला विवस्त्र करून गावातून मिरवणूक काढल्याप्रकरणी पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे. आरोपींनी महिलेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यानंतर पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत आरोपींवर कारवाई केली.
गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील ढलसीमल गावात ही खळबळजनक घटना घडली. एका विवाहित महिलेचे गावातील व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून सासरच्या मंडळींनी तिला लाकडी दांडक्याने मारहाण केली. मग विवस्त्र करून साखळदंडाने मोटारसायकलला बांधून तिची मिरवणूक काढण्यात आली. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला.
महिलेचा पती सध्या हत्येच्या गुन्ह्यात राजकोटमधील तुरुंगात शिक्षा भोगत आहे. गुजरात पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत 12 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये पीडितेचे सासरे, सासू, मेहुणे, पुतणे, नणंद आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
आोरपी महिलांना न्यायालयीन कोठडीत तर चार पुरूष आरोपींना चौकशीसाठी पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. तर चार अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. याशिवाय अन्य तिघांची गुन्ह्यातील भूमिका पोलीस तपासत आहेत.