
म्हैस पाण्यातून बाहेर येईना म्हणून एकामागोमाग पाच मुलं तिला बाहेर काढायला तलावात उतरली. मात्र पाण्यात बुडाल्याने पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील अंजार तहसिलअंतर्गत सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. सर्व मुलं एकाच कुटुंबातील असून 8 ते 14 वर्षे वयोगटातील होती.
हिंगोरजा कस्बे येथील एका कुटुंबातील पाच मुलं नेहमीप्रमाणे म्हशींना चरायला घेऊन गेले होते. यावेळी घरी परतत असताना एक म्हैस तलावात अडकल्याचे त्यांनी पाहिले. म्हशीला बाहेर काढण्यासाठी सर्व मुलं एकामागोमाग एक तलावात उतरली आणि सर्वजण बुडाले.
घटनेची माहिती मिळताच मुलांचे पालक, गावकरी आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. रेस्क्यू टीमने सर्व मृतदेह पाण्यातून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. एकाच कुटुंबातील पाच मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.