
रंगपंचमी साजरी करून घरी जात असताना अचानक लिफ्ट बंद पडल्याने 10 महिला आत अडकल्या. अग्नीशमन दलाने तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर महिलांची सुखरुप सुटका केली. अहमदाबादमधील केबी रॉयल रेसिडेन्शियल सोसायटीमध्ये ही घटना घडली.
रंगपंचमीच्या दिवशी 30 ते 40 वयोगटातील 10 महिला इमारतीखाली सेलिब्रेशन करून लिफ्टने आपापल्या घरी परतत होत्या. यादरम्यान लिफ्टच्या रिलीजिंग व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्यामुळे लिफ्ट तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मध्ये बंद पडली.
लिफ्ट कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र त्यांचे निष्फळ ठरले. अखेर अग्नीशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तीन तास अथक प्रयत्न करत आरसीसी भिंत तोडून लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्व 10 महिलांची सुटका केली. सर्व महिलांनी अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.