
गुजरात गॅसच्या (Gujrat Gas) लाइनसाठी वाड्यात नियम धाब्यावर बसवून देवघर ते चिंचघर असे अडीच किलोमीटरपर्यंत रस्त्याचे खोदकाम केल्याने रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. मात्र चांगले रस्ते उखडले जात असताना ठेकेदाराबरोबर साटेलोटे असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कानाडोळा करत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना वाहनचालकांसह विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पाइपलाइन टाकताना ठेकेदारामार्फत हलगर्जीपणा केला जात असून शहरातील रस्त्यांची तोडफोड ठेकेदारामार्फत करण्यात आलेली आहे. या पाइपलाइनसाठी देवघर ते चिंचघर असा अडीच किलोमीटरचा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना वाहनचालकांच्या नाकीनऊ आले आहे. डोंगस्ता ग्रामपंचायत हद्दीतही ठेकेदाराने याआधी काम केले होते. मात्र तेथेही वाटेल तसे काम करून रस्त्याची दुरवस्था करण्यात आली आहे.
जलवाहिन्या खंडित, वीजवाहिन्या तुटल्या
महत्त्वाचे म्हणजे अनेक वेळा जलवाहिन्या खंडित होत आहेत. तसेच काही वेळा वीजवाहिन्या तुटल्याने बत्तीगुल झाल्याचे प्रकार घडले आहेत. तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.