
द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन आयोजित सियाराम क्रिकेट कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सरस धावगतीच्या आधारावर पोहोचलेल्या गुजरातने गोव्याचा 51 धावांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले.
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 221 अशी जबरदस्त धावसंख्या उभारली होती. मात्र गोव्याच्या संघाला या धावांचा पाठलागच करता आला नाही. त्यांचा डाव 7 बाद 170 धावांवरच रोखत गुजरातने जेतेपदावर आपले शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत विजेत्या संघाला रोख रक्कम व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले तर उपविजेत्या संघालाही रोख रक्कम व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत पूर्ण अंध गटात मालिकावीराचा मानकरी गोव्याच्या आफताब पटेल ठरला, तर अंशतः अंधांमध्ये जिना केसरीने हा मान मिळवला. या कार्यक्रमाला पवन पोतदार, आशीष काबरा व रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विजया मराठे, अर्जुन मुद्दा, भगवान पवार व रेचल शिरसाठ यांनी विशेष परिश्रम घेतले.