आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक राहिलेला हिंदुस्थानचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज पार्थिव पटेलला गुजरात टायटन्सने पळविले आहे. गुजरात टायटन्सने आगामी आयपीएलसाठी पार्थिव पटेल याची संघाचा सहाय्यक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पार्थिव पटेल आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, कोची टस्कर्स केरळ, डेकर चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या फ्रँचायझीकडून खेळला आहे. गुजरात टायटन्सने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘17 वर्षांच्या कारकीर्दीचा अनुभव असलेला टीम इंडियाचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज पार्थिव पटेल संघासाठी खूप अनुभव आणि ज्ञान घेऊन येईल’. दरम्यान, पार्थिव पटेल स्वतः गुजरातचा असल्याने खेळाडूंशी त्याचे संबंध आणखी सुधारू शकतात. पार्थिव पटेलने हिंदुस्थानकडून 25 कसोटी, 38 वनडे आणि दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने अनुक्रमे 934, 736 आणि 36 धावा केल्या आहेत.