गुजरात राज्यातील सापुतारा-माळेगाव घाटात रविवारी पहाटे खासगी ट्रव्हल्स बस दोनशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून, 45 जण जखमी आहेत.
मध्य प्रदेशातील मनपूर, गोपालपूर, रामगढ, पद्मगढ, बीजरावणी, रुसाला, खाटोरा या गावांमधील 50 भाविक उत्तर प्रदेश पासिंगच्या जदाऊन ट्रव्हल्सच्या खासगी बसने चारधाम यात्रेसाठी निघाले होते. नाशिकमधील देवदर्शन आटोपून या भाविकांना घेऊन बस गुजरातच्या दिशेने निघाली. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सोनगड ते पिंपळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील सापुतारा-माळेगाव घाटात चालकाला झोप अनावर झाल्याने बस दोनशे फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचे अक्षरशŠ दोन तुकडे झाले. अपघातात मध्य प्रदेशातील रतनलाल देवीराम जाताव (41), बोलाराम पोसाराम कुशवाह (55), बिजेंद्रसिंग बादलसिंग यादव (55), गुड्डीबेन राजेशसिंग यादव (66) व कमलेशबाई बिरपालसिंग यादव (60) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींपैकी 22 जणांना गुजरातच्या श्यामगव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर 24 जणांना अहवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना पुढील उपचारासाठी सुरत येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी सापुतारा पोलीस ठाण्यात मोटार अपघात दाखल करण्यात आल्याची माहिती सुरगाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल मोरे यांनी दिली.
खरपडी येथे महिला ठार
मध्य प्रदेशातील रिवा येथील काही भाविक मिश्रा ट्रव्हल्सच्या खासगी बसने त्र्यंबकेश्वर येथून दर्शन घेऊन गुजरातच्या दिशेने निघाले होते. हरसूल-पेठ रस्त्यावरील खरपडी घाटातील शेंदरीपाडा फाटय़ाजवळ रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून बस उलटली. त्याखाली दबले गेल्याने सुखीबाई सिंग राठोड (62) या महिलेचा मृत्यू झाला. सोळाजण जखमी असून, त्यांच्यावर हरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे यांनी दिली.