फेक पोलीस, फेक टोलनाका, फेक जजनंतर आता गुजरातमध्ये सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) फेक टीमचा पर्दाफाश झाला आहे. कच्छ पूर्व पोलिसांनी फेक ईडी टीमच्या 10 सदस्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद, गांधीधाम आणि भुज येथून आरोपींना अटक करण्यात आली आहे. ईडी अधिकारी असल्याचे भासवून सराफाला लुटल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणारी ही टीम अहमदाबाद, गांधीधाम आणि भुज या भागात कार्यरत आहेत. आरोपींनी एका सराफा व्यापाऱ्याला ईडीचा धाक दाखवून 17 लाख रुपयांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच सराफा व्यापाऱ्याने कच्छ पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.
सराफा व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपींचा शोध सुरू केला. अहमदाबाद आणि भुज येथे सराफा व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या या टोळीचे टार्गेट गांधीधाम येथील व्यापारी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. आरोपींनी गांधीधाम येथील एका सराफा व्यापाऱ्याच्या दुकानावर आणि घरावर छापा टाकला. मात्र संशय आल्याने सराफा व्यापाऱ्याने पोलिसांना याची माहिती दिली.
गुजरातमध्ये सब गोलमाल है! सराफाला लुटणाऱ्या फेक ED टीमचा पर्दाफाश, 10 जणांना अटक pic.twitter.com/83X5tvEn4g
— Saamana Online (@SaamanaOnline) December 5, 2024
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचत दोन आरोपींना अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्हा कबूल करत इतर आरोपींचीही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अहमदाबाद आणि भुज येथून आठ जणांना अटक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक सागर बागमोरे (Sagar Bagamore) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ‘गुजरात समाचार‘ने याबाबत वृत्त दिले आहे.