
गुजरातमधील द्वारका जिल्ह्यामध्ये चोरीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. 25 फेब्रुवारी रोजी शिवभक्त महाशिवरात्रीची तयारी करत असताना हर्षद भागातील कल्याणपूर येथील भीडभंजन महादेव मंदिरात शिवलिंगाची चोरी झाली. यामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली.
सुरुवातीला शिवलिंग अरबी समुद्रामध्ये टाकण्यात आले असावे असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी स्कूबा डायव्हिंग पथकाच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही. यानंतर अधिक तपास केला असता सत्य समोर आले आणि सर्वांनाच धक्का बसला.
शिवलिंगाची चोरी संपत्तीच्या लालसेने करण्यात आली नव्हती. मुलीच्या स्वप्नात महादेवाची पिंड दिसल्याने द्वारकापासून 500 किलोमीटर दूर असलेल्या साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने ही चोरी केली होती. याचा खुलासा होताच पोलिसांनी एकाच कुटुंबातील 8 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
मुख्य आरोपी महेंद्र कुमार उर्फ रमेश करणसिंह मकवाणा यांनी पोलीस चौकशीत सांगितले की, माझ्या भाचीला एक स्वप्न पडले होते. भीडभंजन महादेव मंदिरातील शिवलिंग घरामध्ये स्थापित केले तर कुटुंबाची भरभराट होईल असे तिला स्वप्नात दिसले होते.
भाचीला पडलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी महेंद्र मकवाणा आणि त्यांच्या कुटुंबाने शिवलिंग चोरी करण्याचे ठरवले. मकवाणा कुटुंबीय दोन गाड्यांनी आले आणि त्यांनी आधी रेकी केली. त्यानंतर 25 फेब्रुवारीला पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान शिवलिंगाची चोरी करून सांबरकाठाला पोहोचले. शिवरात्रीच्या दिवशी त्यांनी या शिवलिंगाची घरात स्थापनाही केली.
इकडे ऐन शिवरात्रीला पुरातन मंदिरातील शिवलिंग चोरी झाल्याचे निदर्शनास आले आणि एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे मंदिरातील एकही मौल्यवान वस्तू चोरी झाली नाही आणि फक्त शिवलिंगच चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. या घटेनंतर शिवभक्तांनी पोलिसांना घेरत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्र हलवली आणि एकाच कुटुंबातील आठ जणांना अटक केली. यात महिलांचाही समावेश आहे, अशी माहिती द्वारकाचे एसपी नितीश पांडे यांनी दिली. तसेच पोलिसांनी शिवलिंग जप्त करत मंदिरामध्ये त्याची पुनर्स्थापना केली.