गुजरातमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 18 जणांचा मृत्यू; मालक फरार, चौकशीचे आदेश

गुजरातच्या बनासकांठामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कारखान्यातील बॉलटर फुटल्याने हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेवेळी कारखान्यात 30 कामगार काम करत होते. स्फोटानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत.

दुर्घटनेनंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. स्फोटानंतर कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. धुराचे लोळ उठत आहेत. या स्फोटाचा आवाज खूप दूरपर्यंत गेला. या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला, असे स्थानिकांनी सांगितले. स्फोटात कारखान्याचा एक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक दबलेले आहेत. तर जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक विजय चौधरी यांनी दिली. टीव्ही 9 हे वृत्त दिले आहे.

दीपक ट्रेडर्स या कारखान्यात हा स्फोट झाला. फटाके बनवण्याचा हा कारखाना आहे. स्फोटानंतर कारखान्याचा मालक फरार झाला आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी माहीर पटेल दाखल झाले आहेत. कारखान्याकडे फटाके बनवण्याचा परवाना होता की नाही? याचा तपास केला जात आहे. तसेच घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आली आहेत.