बिगर भाजप शासित राज्यात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असं वातावरण गेल्या 10 वर्षात पाहायला मिळालं आहे. तमिळनाडूत देखील हीच परिस्थिती कायम आहे. राज्यपाल आर एन रवी यांनी सत्ताधारी द्रमुक सरकार सिंथेटिक ड्रग्सच्या घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी ठरल्याची टीका करत तमिळनाडू पोलीस एक ग्रॅम ड्रग्ज जप्त करू शकले नाहीत, असा आरोप केला होता. राज्यपालांच्या या विधानावर तमिळनाडूचे मंत्री एस रेगुपथी यांनी गुजरातला ‘drug capital’ (ड्रगची राजधानी) असं संबोधलं आहे.
वस्तुस्थिती जाणून न घेता असं वक्तव्य केल्याबद्दल मंत्र्यांनी राज्यपाल रवी यांचा निषेध केला. गुजरात हे राज्य ड्रग्जशी संबंधित गोष्टींचे केंद्र बनले आहे त्यावर राज्यपाल रवी यांनी चिंता का व्यक्त केली नाही? असा प्रश्न रेगुपथी यांनी उपस्थित केला.
‘तीन वर्षात मला भरपूर गांजा जप्त झाल्याच्या बातम्या येत आहेत. केंद्रीय एजन्सी शेकडो किलो सिंथेटिक आणि केमिकल ड्रग्ज जप्त कशा करू शकतात तर आमच्या राज्यातील यंत्रणा (तमिळनाडू पोलीस) एक ग्रॅम सुद्धा जप्त करू शकत नाहीत!’, अशी टीका राज्यपाल रवी यांनी केला.
रेगुपथी यांनी प्रश्न केला की, ‘अन्नाद्रमुकच्या माजी मंत्र्यांवर अंमली पदार्थांशी संबंधित खटले नोंदवण्याची परवानगी एका वर्षाहून अधिक काळ रोखणाऱ्या राज्यपालांना राज्य सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार आहे का?’, अशा खरपूस शब्दात त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
‘देशभरात अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये अडकलेल्या भाजपच्या लोकांबद्दल राज्यपाल का बोलत नाहीत? ते अमली पदार्थांची राजधानी गुजरातबद्दल का बोलत नाहीत?’, असा प्रश्न त्यांनी विचारला.
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकार सत्तेवर आल्यानंतरच राज्यात अंमली पदार्थांविरुद्ध धोरण सुरू करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
रेगुपथी म्हणाले की 2023 मध्ये 14,770 लोकांवर 10,256 खटले दाखल करण्यात आले होते आणि राज्यपाल रवी यांनी अशा आकडेवारीची माहिती नसताना देखील ड्रग्जच्या मुद्द्यावर बोलल्याचा आरोप त्यांनी केला.
सन 2023 मध्ये 14,770 लोकांविरुद्ध 10,256 गुन्हे दाखल करण्यात आले होते. 23,364 किलो गांजा, 0.953 किलो हेरॉईन, 39,910 गोळ्या, 1,230 किलो गांजा फकडण्यात आले. या वर्षी ऑगस्टपर्यंत अनेकांना पकडण्यात आले. 6,053 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, 15,092 किलो गांजा, 90,833 गोळ्या, 93 किलो मेथॅम्फेटामाइन आणि इतर औषधे जप्त करण्यात आले आहेत’, अशी माहिती तामिळनाडूचे कायदा मंत्री एस रेगुपथी यांनी दिली.