
गुजरातमध्ये सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) तोतया पथकाला अटक झाल्याचे समोर येऊन 24 तास उलटत तोच आणखी एक बोगस प्रकरण उघडकीस आले आहे. गुजरात पोलिसांनी 14 ‘मुन्नाभाईं’ना अटक केली आहे. पैसे देऊन खोट्या पदव्या मिळवलेल्या या ‘मुन्नाभाईं’नी मोठ मोठे दवाखानेही थाटले होते. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सूरतमध्ये बनावट ‘बॅचलर ऑफ इलेक्ट्रो-होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी’ (बीईएमएस) पदवी घेणाऱ्या 10 डॉक्टरांसह 14 जणांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. आरोपींनी 70 हजार रुपये घेऊन आठवी पास लोकांनाही मेडिकलची डिग्री विकली. याचा वापर करत त्यांनी बनावट दवाखानेही थाटले होते. याचा सुगावा लागताच पोलिसांनी छापेमारी करत आरोपींच्या दवाखान्याती ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीची औषधे, इंजेक्शन्स, सिरपच्या बाटल्या, हजारो अर्ज, स्टँप आणि 12 हजार बोगस डिग्री प्रमाणपत्रे जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करणारे रमेश गुजराती (रा. सूरत), बीके रावत (रा. अहमदाबाद) आणि त्यांचा सहकारी इरफान सय्यत असे तिघे बीईएमएसची बनावट डिग्री 70 हजार रुपयांना विकत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. यानंतर ‘बोर्ड ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथिक मेडिसिन, अहमदाबाद’च्या नावाखाली हा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी महसूल विभागाच्या पथकासह आरोपीच्या दवाखान्यावर छापा टाकला.
छापेमारीवेळी आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. एवढेच नाही तर त्यांनी दाखवलेले प्रमाणपत्रही बनावट असल्याचे समोर आले. गुजरात सरकार अशी कोणतीही डिग्री देत नसल्याचे उघड झाले. आरोपी बनावट वेबसाईटवर डिग्रीची नोंदणी करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. सदर प्रकरणातील मुख्य आरोपीला जेव्हा कळले की हिंदुस्थानमध्ये इलेक्ट्रो-होमिओपॅथीचे कोणतेही नियम नाहीत, तेव्हा त्याने या अभ्यासक्रमासाठी पदवी प्रदान करण्यासाठी बोर्ड स्थापन करण्याची योजना आखली, असे पोलिसांनी सांगितले. यासाठी त्याने 5 लोकांना कामावर ठेवले. त्यांना इलेक्ट्रो-होमिओपॅथीचे प्रशिक्षण दिले. त्यांनी अवघ्या तीन वर्षांमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केला, असेही पोलिसांनी सांगितले.
गुजरातच्या गांधीधाम येथे ईडीच्या 12 तोतया अधिकाऱ्यांच्या पथकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
वाचा सविस्तर- https://t.co/mNK1zHKkm3 pic.twitter.com/n1sZjKcGyL— Saamana Online (@SaamanaOnline) December 6, 2024
इलेक्ट्रो-होमिओपॅथीचे उपचार घेण्यास लोक घाबरत असल्याचे कळताच आरोपींनी योजना बदलली आणि गुजरातच्या आयुष मंत्रालयाच्या नावाने बनावट डिग्री देण्यास सुरुवात केली. यासाठी बीईएचएमचे राज्य सरकारशी टायअप असल्याचेही सांगितले. यानंतर डिग्रीसाठी 70 हजार रुपये आकारले व प्रशिक्षणही देण्यास सुरुवात केली. या प्रमाणपत्रामुळे ते कोणत्याही समस्येशिवाय ॲलोपॅथी, होमिओपॅथी मेडिकल प्रॅक्टिस करू शकत होते, असे पोलिसांनी सांगितले. तसेच पैसे भरल्यानंतर 15 दिवसांच्या आत प्रमाणपत्रे देण्यात येत होती आणि प्रमाणपत्रांच्या वैधतेचा कालावधी 1 वर्ष ठेवण्यात आला होता. त्यानंतर 5 ते 15 हजार रुपये भरून त्याचे नुतनीकरण करावे लागत होते. नुतनीकरण शुल्क भरू न शकलेल्या डॉक्टरांना या टोळीकडून धमक्याही दिल्या जात होत्या, असे पोलिसांनी सांगितले.