‘नीट’ घोटाळय़ामागेही गुजरातचेच कनेक्शन; मास्टरमाईंड गोध्रामध्ये!

NEET-PAPER-LEAK

गोध्रासह खेडा, आनंद व अहमदाबाद या चार जिह्यांतील सात ठिकाणी लागोपाठ धाडी टाकण्यात आल्या. संशयित आरोपींच्या घर, कार्यालयांच्या आवारात कसून झाडाझडती घेतली.

नीट परीक्षेतील घोटाळय़ामुळे मोदी सरकारची देशभर नाचक्की झाली असतानाच घोटाळय़ामागील गुजरात कनेक्शनचे बिंग फुटले आहे. घोटाळय़ाचा मास्टरमाईंड गोध्रामध्ये आहे. त्याने इतर राज्यांतील विद्यार्थ्यांना गोध्राच्या केंद्रामधून परीक्षा देण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे. त्या मास्टरमाईंडचा शोध घेण्यासाठी सीबीआयने शनिवारी गुजरातच्या चार जिह्यांतील सात ठिकाणी छापेमारी केली.

नीट-यूजी परीक्षेतील पेपरफुटी, निवडक विद्यार्थ्यांवरील वाढीव गुणांची खैरात, परीक्षा केंद्रातील आसन क्रमांकांची अदलाबदल या सर्व घोटाळय़ामुळे मोदी सरकार व राष्ट्रीय परीक्षा संस्थेवर (एनटीए) टीकेची झोड उठली आहे. शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी मोदी सरकारविरुद्ध जोरदार हंगामा केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सीबीआयच्या पथकांनी घोटाळय़ाचा केंद्रबिंदू शोधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये धडक छापेमारी केली. केंद्रीय तपास यंत्रणेने शनिवारी सकाळीच छापासत्र सुरू केले. प्रामुख्याने गोध्रासह खेडा, आनंद व अहमदाबाद या चार जिह्यांतील सात ठिकाणी लागोपाठ धाडी टाकण्यात आल्या. संशयित आरोपींच्या घर, कार्यालयांच्या आवारात कसून झाडाझडती घेतली. सीबीआयने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या संदर्भावरून सहा एफआयआर दाखल करून कारवाई तीव्र केली आहे. दरम्यान, या घोटाळय़ाप्रकरणी झारखंडच्या हजारीबाग येथून जमालुद्दीन नावाच्या एका पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. जमालुद्दीनने शुक्रवारी अटक केलेल्या प्राचार्य, उपप्राचार्यांशी संपर्कात राहून नीट घोटाळय़ाचे कारस्थान रचल्याचे उघडकीस आले आहे.

गुजरात पोलिसांनी अटक केलेल्या पाचपैकी चार आरोपींची कोठडी सीबीआयने मागितली. त्यांच्या चौकशीतून देशपातळीवरील नीट घोटाळय़ाच्या मोठय़ा कारस्थानाचा पर्दाफाश होईल. गोध्रातील मास्टरमाईंड हाती लागेल, असे सीबीआयने न्यायालयात सांगितले.

घोटाळय़ाचा ‘गोध्रा पॅटर्न’

गुजरातमधील आरोपींनी इतर राज्यांतील विद्यार्थ्यांना गोध्रा येथूनच नीट-यूजी परीक्षा देण्यास सांगितले.

विद्यार्थ्यांना गोध्रा परीक्षा केंद्र निवडण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच परीक्षेसाठी भाषेचा पर्याय निवडताना अर्जात ‘गुजराती’ माध्यम नोंदवण्यास सांगितले.

घोटाळय़ाच्या सूत्रधारांनी इतर राज्यांतील विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात कसे ओढले, याचा तपास सुरू आहे.

नीट-पीजी परीक्षेची नवी तारीख दोन दिवसांत जाहीर करणार 

अनियमिततेमुळे रद्द करावी लागलेली नीट-पीजी परीक्षेची नवीन तारीख येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाईल, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

परीक्षा केंद्राशी भाजप नेत्यांचा संबंध!

‘नीट’ घोटाळय़ात नाव पुढे आलेल्या गोध्रा येथील ‘जय जलाराम इंटरनॅशनल स्कूल’च्या मालकांचे भाजप नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. शाळेच्या ट्रस्टकडून भाजपला पैसे पुरवले जातात. याच भ्रष्ट संबंधामुळे घोटाळय़ात परीक्षा केंद्र असलेल्या शाळेला वाचवण्याचा प्रयत्न भाजप करतेय, असा आरोप गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खासदार शक्तिसिंह गोहिल यांनी केला.