
गुजरातमधील बनासकांठा जिह्यातील डिसा येथील एका फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात 18 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्फोट इतका भयंकर होता की कामगारांच्या अक्षरशŠ चिंधडय़ा उडाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांनी सांगितले. दरम्यान, येथे केवळ गोदामाची परवानगी होती. परंतु, गोदामाच्या नावाखाली याठिकाणी अवैधरित्या फटाक्यांचा कारखाना सुरू होता. स्फोटानंतर लागलेल्या आगीची तीव्रता इतकी भीषण होती की फॅक्टरीचा मलबा तब्बल 200 मीटरपर्यंत पोहोचला. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला.
आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या गाडय़ा तत्काळ घटनास्थळी रवाना झाल्या आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. स्फोटात फॅक्टरीची भिंतही ढासळली. दुर्घटनेवेळी फॅक्टरीत 20 कामगार काम करत होते अशी प्राथमिक माहिती आहे. बॉयलरमुळे गोदामात मोठी आग लागल्याचा दावा करण्यात येत आहे. गोदामात स्फोट झाल्यानंतर मालक पळून गेला असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.