उद्विग्न झालेल्या ‘आप’च्या नेत्याने स्वत:ला बेल्टने मारून घेतलं, सुरतमधील जाहीर सभेतील घटना

गुजरातमध्ये घडलेल्या अनेक घटनांना अद्यापही न्याय न मिळाल्याच्या प्रकरणावरून सुरतेतील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. सुरतचे आम आदमी पक्षाचे नेते गोपाल इटायिया यांनी जाहीर सभेत न्यायाची मागणी करत स्वत:ला बेल्टने मारून घेतल्याची घटना घडली आहे.

सुरतमधील एका सभेत भाषण करत असताना गोपाल इटालिया यांनी भाजपवर निशाणा साधला. गोपाल इटालिया यांनी आपल्या भाषणात बोटाद लट्ठा कांड, मोरबी पूल अपघात, हरणी कांड, तक्षशिला अग्निकांड, राजकोटमधील गेमझोन दुर्घटना आणि दाहोद व जसदनमधील बलात्कारांच्या घटनांवर भाष्य केलं. इतक्या घटना घडूनही पीडितांना अद्यापही न्याय मिळत नसल्याची खंत या सभेत गोपाल इटालिया यांनी व्यक्त केली.

‘गुजरातमध्ये अनेक धक्कादायक घटना घडल्या. या घटनांमध्ये अनेक निष्पाप जीवांनी आपला जीव गमावला. मात्र, घटना घडून बराच काळ उलटून गेला तरी अद्यापही पीडितांना न्याय मिळालेला नाही. भाजप सरकारच्या निष्काळजीपणाने पीडितांच्या दु:खात आणखी भर पडली आहे. मी आणि माझ्या पक्षाने सर्वोतोपरी न्यायालयीन आणि सामाजिक प्रयत्न केले. पण पीडितांना न्याय मिळाला नाही. अमरेली कांडमध्येही आम्ही पोलिसांची आणि प्रशासनाची भेट घेतली. पण त्यावरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

न्यायासाठी संघर्ष करूनही न्याय मिळत नसल्याने गोपाल इटालिया यांनी भरसभेत स्वत: ला बेल्टने मारले. ज्या क्षणी गुजरातची जनता जागी होऊन अन्याया विरोधात लढेल, तेव्हा आपल्याला कोणीही अडवू शकत नाही, असे म्हणत गुजरातच्या जनतेला अन्याविरोधात उभे राहाण्याचे आवाहन केले.