
गुढीपाडव्यानिमित्त मुंबई शहर आणि उपनगरात नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी नक्षीदार रांगोळय़ा, भव्यदिव्य गुढी, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे आणि सामाजिक संदेश देणारे चित्ररथ, महिलांची बाईक रॅली, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेली तरुणाई, सेलिब्रेटींची मांदियाळी असे उत्साहपूर्ण वातावरण यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे.
दादरमध्ये संस्कृती, परंपरेचे दर्शन
गुढीपाडव्यानिमित्त शिवसेना माहीम विधानसभेच्या वतीने विभागप्रमुख – आमदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभादेवी, दादर, माहीम परिसरात सकाळी 9 वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडणार आहे. स्थानिक नागरिकांसह शिवसैनिकांचा सहभाग या शोभायात्रेत असणार आहे.
गिरगावात मायमराठीचा जागर
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 च्या वतीने शिवसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या सोहळय़ाची संकल्पना ‘माय मराठी’ अशी आहे. गुढीपाडव्याला सकाळी गिरगाव नाका येथून ही स्वागत यात्रा सुरू होईल. गिरगावातील महिला बाईकस्वार पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 22 फुटांची भव्य मूर्ती तसेच गिरगावच्या महाराजाची सुबक मूर्ती या स्वागत सोहळय़ाचे खास आकर्षण आहे. या यात्रेस प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ असा संदेश देणारा चित्ररथ त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय देखावासुद्धा सोहळय़ात असणार आहे.
ताडदेवला 51 फुटांची भव्य गुढी
शिवसेना, युवासेना आणि जय भवानी प्रतिष्ठान यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त रविवारी सकाळी 8 वाजता हिंदू नववर्ष स्वागत वैभव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नाना चौकातील नाना शंकरशेठ महादेव मंदिर येथून या यात्रेला सुरुवात होईल.