
गिरगावात गुढीपाडव्याला मातृभाषेचा जागर आणि अभिजात मराठीचा गौरव होणार आहे. स्वागत यात्रांनी दक्षिण मुंबई अक्षरशः दणाणून जाणार असून पारंपरिक वेशात आलेले तरुण, तरुणी आणि ढोलताशांचा गजर हे मिरवणुकांचे मुख्य आकर्षण असणार आहे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा अर्थात गिरगावचा पाडवा गुढीपाडव्याच्या शुभदिनी 30 मार्च रोजी सकाळी 8 वाजता फडके श्रीगणपती मंदिरापासून मातृभाषेचा जागर होणार आहे.
मातृभाषेला घालू साद- माय मराठी अभिजात अशी यात्रेची संकल्पना आहे. मुर्तिकार मितेश पवार आणि गौरव पवार यांनी साकारलेल्या पर्यावरणस्नेही 20 फूट उंच ज्ञानोबा माउलींच्या हातात यात्रेची मुख्य गुढी असेल.
मराठी अभिमान गीत गायनाने उत्साह वाढणार
सेंटॅक कॉर्पोरेशनचे संस्थापक चंद्रगुप्त (हर्षद) भिडे यांच्या अध्यक्षतेखाली स्वागत समिती तयार करण्यात आली आहे. 14 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे संगितकार काwशल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी अभिमान गीत सामूहिक गायन होणार आहे. तसेच संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. अपर्णा बेडेकर यांनी संपादित केलेला चैत्रव स्वागत नावाचा गुढी पाडवा विशेषांक 23 मार्च रोजी प्रकाशित होईल. इच्छूकांनी 9 मार्च रोजी चित्पावन ब्राम्हण संघ, गिरगाव येथे सकाळी 10 वाजता मंडळ आणि हितचिंतकांच्या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीधर आगरकर. कार्याध्यक्ष आशुतोष वेदक, सचिव स्वप्निल गुरव आणि यात्राप्रमुख मनीष वडके यांनी केले आहे.