>> अनघा साखरे
ऋतुराज वसंताच्या आगमनाची चाहूल लागते आणि चैत्र आपलं स्वागत करण्यास तयार होतो. हिंदुस्थानचे धार्मिक अधिष्ठान, परंपरा, संस्कृती याच चैत्रापासून सुरू होतात. म्हणून हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडव्याला नैसर्गिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अपार महत्त्व आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला ‘गुढीपाडवा’ असे म्हटले जाते आणि महाराष्ट्रातील घराघरांतून नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सकाळपासूनच लगबग सुरू झालेली असते. ऋतुराज वसंताच्या आगमनाची चाहूल आपल्या आजूबाजूच्या निसर्गातून माणसांना लागलेली असते. कोकिळ पक्ष्याने आपल्या कंठातून मंगल आवाजात “वसंत आला, वसंत आला” अशी ललकारी दिलेली असते. सर्व चराचर सृष्टीमध्ये शिशिराची पानगळ संपून वृक्ष, वनस्पती, तरुवेलींना नवीन कोवळी पालवी फुटत असते. सृष्टीच्या या नवसृजनाचा गंध सगळ्या आसमंतात दरवळत असतो. जणू काही निसर्गच नवरंगांनी बहरत असतो. कुठे कोकणचा राजा हापूसचा सुगंध, तर कुठे मोगरा, मदनबाणाला बहर आलेला असतो. कुठे जाईजुई, शेवंती, सोनचाफा आपल्या परिमलाने सगळा आसमंत सुगंधित करत असतात आणि सृष्टीचे हे नवचैतन्य पाहायला माणसंही तशी मोकळी झालेली असतात. उन्हाळी रब्बी पीक दाराशी आलेलं असतं. त्यामुळे बळीराजा निवांत, तर उद्योगधंद्यांचे, कामगारांचे, व्यापाऱयांचे आर्थिक वर्ष संपलेले असल्याने. नवीन काही नववर्षात सुरू करण्याच्या उमेदीने तयारीला लागलेले, असे एक सुंदर, लोभस दृश्य चैत्रामध्ये दिसत असते.
पाडव्याला सकाळपासूनच सनई, चौघडा, तर कुठे मंगल वाद्यांचे स्वर घुमत असतात. महिला वर्ग घराबाहेर सुंदर रांगोळ्या रेखाटत असतात, तर पुरुष वर्ग विजयाचे, मांगल्याचे प्रतीक असलेली गुढी उभारण्यामध्ये दंग असतात. त्या दिवशी नवीन लाकडी दंड घेऊन, पवित्र जलाने तो दंड साफ करून, त्याला हळदीकुंकू, चंदन, अक्षता लावून सजवला जातो. त्या दंडाला नवीन भरजरी वस्त्र बांधून, साखरेची माळ, चाफा किंवा झेंडूच्या फुलांची माळ लावून त्यावर मांगल्याचे प्रतीक असलेला चांदीचा कलश ठेवला जातो. नववर्षाचं स्वागत म्हणून त्या गुढीची विधिवत पूजा केली जाते. प्रसाद म्हणून या दिवशी कडुनिंबाची पाने आणि साखर सर्वांना दिली जाते. यामध्ये थोडा आयुर्वेदाचाही विचार आमच्या ऋषीमुनींनी केलेला आहे. कडुनिंब हा आयुर्वेदात अनेक शारीरिक रोगांसाठी उपयोगी असा वृक्ष आहे. म्हणून या दिवशी कडुनिंबाचे सेवन करण्याचा प्रघात आहे. त्यासोबतच मानवी जीवनामध्ये सुखदु:ख हे चालू राहणार. त्या कडूगोडाचा स्वीकार करून आपल्याला जीवनात पुढे जायचे आहे, या गोष्टीचे हे प्रतीक आहे.
आज गुढीपाडव्याच्या दिवसापासून शालिवाहन शक 1946 क्रोधीनाम संवत्सर सुरू होत आहे. पैठणमधील शालिवाहन राजाने निस्तेज हीनदीन, लाचार, बनलेल्या लोकांमध्ये तेजस्वी विचारांचं आणि शौर्याचे आरोहण करून त्या सर्वसामान्य लोकांना कणखरपणे उभे केले आणि परकीय शक राज्यकर्त्याचा दारुण पराभव करून अद्वितीय असा विजय मिळवला. या विजयाचे प्रतीक म्हणून, आठवण म्हणून या दिवसापासून म्हणजे इसवी सन 78 पासून शालिवाहन शकगणना सुरू झाली.
हिंदुस्थानी कालगणना ही चंद्र आणि सूर्याच्या भ्रमणावर अवलंबून आहे. ख्रिस्ती धर्मामध्ये सूर्यावर आधारित कालगणना केली जाते, तर मुस्लिम धर्मामध्ये चंद्रावर आधारित कालगणना करतात. चंद्राचे शुभदर्शन झाले की, दुसऱया दिवशी ते ईदचा सण साजरा करतात, पण हिंदू धर्मामध्ये चंद्र आणि सूर्य या दोघांनाही महत्त्व असून या सृष्टीला दोन डोळे आहेत असे म्हटले जाते. दिवसा सृष्टी सूर्याच्या डोळ्याने पाहते आणि रात्री चंद्राच्या डोळ्याने. सूर्य आणि चंद्र यांचे भ्रमण, त्यांचे घडत असलेले वेगवेगळे योग आणि त्या गणितावर आधारित कालगणना असल्यामुळे तिथी, वार, नक्षत्रे यावर आधारित चैत्र ते फाल्गुन अशी बारा महिन्यांची रचना करण्यात आली आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा सूर्योदयाला ज्या दिवशी असेल तो दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस गणला जातो तो म्हणजे गुढीपाडवा. याच दिवशी ब्रह्मदेवानं या चराचर सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते आणि या दिवशी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते.
पाडव्याचे हिंदू धर्मीयांसाठी आणखी एक महत्त्व म्हणजे प्रभू रामचंद्र आपला 14 वर्षांचा वनवास संपवून, लंकेच्या रावणाला पूर्ण पराभूत करून सीतामाईला आपल्या सोबत घेऊन पुष्पक विमानातून अयोध्या नगरीमध्ये परतले ते पाडव्याच्या दिवशी. त्यामुळे सगळ्या अयोध्यावासी नागरिकांनी संपूर्ण नगरामध्ये सुगंधी गुलाबपाण्याचे सिंचन करून, रस्त्यारस्त्यावर आकर्षक अशा रंगपुष्पांच्या रांगोळ्या घालून, घराघरांमध्ये गुढय़ा, तोरणे, दीप प्रज्वलित केले, तर राजमार्गावर आकर्षक, सुशोभित अशा स्वागत कमानी, पताका, धर्मध्वज उभारून, मंगल वाद्यांच्या निनादात प्रभू रामचंद्रांचे सपत्नीक अयोध्या नगरीमध्ये स्वागत केले आणि या दिवसाला एक सुवर्णलेणे प्राप्त झाले. त्यामुळे गुढीपाडवा हा दिवस विजयाचे, आनंदाचे, मांगल्याचे प्रतीक मानला जातो.
सध्या ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन केले जाते. पारंपरिक पोशाख, पारंपरिक शृंगार करून सर्वजण नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ आकर्षक अशा शोभायात्रांमध्ये सामील होतात. या शोभायात्रेमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्था आपले वेगवेगळे सामाजिक संदेश देणारे चित्ररथ, शिवाय तरुणांची ढोलताशा, लेझीम पथके तर कुठे टाळ-मृदंगाच्या साथीने वारकरी भजने गात, आकर्षक अशा गालिचा रांगोळ्या काढलेल्या, गुढय़ातोरणे, कमानी उभारलेल्या सुशोभित रस्त्यावरून संपूर्ण शोभायात्रा मंगलमय वातावरणामध्ये नगराला फेरी मारते आणि एक वेगळीच वातावरण निर्मिती केली जाते. असा हा मांगल्याचा, परामाचा गुढीपाडवा आपणा सर्वांना आनंदाचा जावो हीच शुभेच्छा!