रेडिमेड कपडे, तंबाखू आणि सिगारेट महागणार, जीएसटी 28 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढणार

जीएसटी कौन्सिलच्या 21 डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत कराचे दर बदलले जाण्याची दाट शक्यता आहे. जीएसटी संरचना सुलभ करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने तंबाखू आणि सर्व तंबाखू उत्पादने, एरेटेड शीतपेये (सोडा ड्रिंक-कोल्डड्रिंक) इत्यादीवरील कर दर सध्याच्या 28 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. मंत्र्यांच्या गटाने एकूण 148 वस्तूंच्या दरांमध्ये 1,500 रुपयांपर्यंतच्या रेडिमेड कपड्यांवर 5 टक्के जीएसटी, तर 1,500 ते 10,000 रुपयांपर्यंतच्या रेडिमेड कपड्यांवर 18 टक्के जीएसटी लागू करण्याची शिफारस केली आहे. चामड्याच्या पिशव्या, सौंदर्य प्रसाधन यांसह अनेक लक्झरी वस्तूंवर जीएसटी वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे.

रोजच्या आणि सामान्य वापराच्या वस्तू स्वस्त करण्याची शिफारस केली जाते. हातावरची म्हणजेच मनगटी घड्याळवरील जीएसटीसुद्धा वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. 25 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळ्यावरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत करण्याची सूचना करण्यात आली आहे. 15 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बुटावरसुद्धा जीएसटी 18 टक्क्यांवरून 28 टक्के वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे.

जीएसटीतून 1.82 लाख कोटी जमा

केंद्र सरकारने नोव्हेंबर 2024 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमधून 1.82 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. वार्षिक आधारावर 8.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी म्हणजेच नोव्हेंबर 2023 मध्ये सरकारने 1.68 लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा केला होता.

कधी होणार बैठक

जीएसटी परिषदेची 55वी बैठक 21 डिसेंबर रोजी जैसलमेर येथे होणार आहे. कौन्सिलने 9 सप्टेंबर रोजी आपल्या शेवटच्या बैठकीत विम्यावर जीएसटी लादण्याबाबत अहवाल सादर करण्यास मंत्रीगटाला सांगितले होते. आरोग्य आणि जीवन विमा उत्पादनांवर जीएसटी लादण्याबाबत मंत्रीगटाची बैठक झाली होती. या बैठकीत आरोग्य विमा, टर्म लाइफ इन्शुरन्सवरील जीएसटीबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो.

शिफारशींवर निर्णय

मंत्री गटाच्या शिफारशींवर जीएसटी परिषद अंतिम निर्णय घेतला जाईल. 13 सदस्यीय मंत्री गटाचे निमंत्रक बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आहेत. मंत्रिगटात उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, मेघालय, पंजाब, तामीळनाडू आणि तेलंगणातील मंत्र्यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील नेत्याचे नाव नाही.