
मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) ग्रोथ हब सुरू करण्याकरिता निवडण्यात आलेल्या जागा पाहता राज्याच्या अर्थसंकल्पातील ही घोषणा अदानी समूहाच्या गुंतवणुकीला चालना देणारी ठरणार आहे. कारण, ग्रोथ हबकरिता निवडण्यात आलेल्या बहुतांश ठिकाणी मोदी सरकारच्या काळात भरभराटीला आलेल्या अदानी समूहाने मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या या ‘अदानी जिथे जिथे, ग्रोथ हब तिथे तिथे’ धोरणामुळे भविष्यात महामुंबईची ग्रोथ झाली नाही तरी अदानीची निश्चितपणे होणार आहे.
यापैकी एक केंद्र वांद्रे-कुर्ला संकुलात, तर दुसरे वडाळा येथे असेल. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली इथल्या 300 एकरसह बाजूचा 240 एकरचा भूखंड अदानीला आंदण देण्यात आला आहे. या भूखंडावर प्रति बीकेसी उभारण्याची योजना आहे. बीकेसी आणि वडाळ्याला लागून असलेल्या ग्रोथ सेंटरची फळे धारावीत उभ्या राहणाऱ्या अदानीच्या साम्राज्याला चाखायला न मिळतील तरच नवल! याशिवाय विलेपार्ले येथे 2 बिलियन अमेरिकन डॉलर्स खर्चून जिओच्या बीकेसीमधील वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला तगडी स्पर्धा देईल असे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर सुरू करण्याची अदानीची योजना आहे. यालाही सरकारच्या ग्रोथ सेंटरमुळे पाठबळ मिळेल.
तिसरे केंद्र कुर्ला येथे असेल. इथली मदर डेअरीची 21 एकरची जागाही धारावीच्या विकासाच्या नावाखाली कोणतेही टेंडर न मागविता नाममात्र दराने आधीच अदानीच्या घशात घातली आहे. चौथे ग्रोथ सेंटर गोरेगावमध्ये असेल. येथील 142 एकरवरील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाचे काम अदानीला मिळाल्यात जमा आहे. याशिवाय नवी मुंबई, खारघर येथे दोन ग्रोथ सेंटर असतील. मे महिन्यात सुरू होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचलन अदानींकडे असल्याने या दोन्ही केंद्रांचा फायदा इथले दळणवळण वाढविण्यास होणार आहे. हेही अदानीच्या पथ्यावरच पडेल.
आणखी एक ग्रोथ सेंटर वरळी येथे असेल. वांद्रे-वरळी सी लिंकला वांद्रे येथे लागून असलेला एमएसआरडीसीच्या 24 एकरच्या भूखंड विकासाचे काम अदानीला बहाल केले आहे. त्यामुळे भविष्यात वरळी येथे विकसित होणाऱ्या ग्रोथ सेंटरचा फायदा अदानीच्या या भूखंडांवरील उद्योगांनाही होणार आहे.
ग्रोथ हब काय…
मुंबई महानगर प्रदेश आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याची योजना महायुती सरकारने अर्थसंकल्पात आखली आहे. त्यात पाच वर्षांत मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्याच्या 140 बिलीयन डॉलर्सवरून 300 बिलियन डॉलर्सवर नेण्याचे गाजर दाखविण्यात आले आहे.